अधिवेशनाची तयारी जोरात; रस्त्यांची डागडुजी व रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 03:08 PM2022-11-16T15:08:16+5:302022-11-16T15:11:54+5:30
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. विधानभवन व परिसर, रविभवन, हैदराबाद हाउस, नागभवन, आमदार निवास या परिसरातील रस्त्यांची डागडुजी, चौक व रस्ता दुभाजकांच्या रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात केली जात आहे. तसेच स्वच्छता, पाणीपुरवठा व अग्निशमन विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.
सिव्हिल लाइन्स परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजीला बुधवारपासून सुरुवात केली जाणार आहे. तसेच रस्ता दुभाजकांची रंगरंगोटी, वृक्षारोपणाच्या कामांना सुरुवात केली जात आहे. अधिवेशन काळात विधानभवन परिसर, आमदार निवास, रविभवन यांसह या भागातील स्वच्छता करण्यासाठी १०० हून अधिक स्वच्छता कर्मचारी तैनात केले जाणार असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
अधिवेशन काळात मोठ्या प्रमाणात मोर्चे निघतात. या परिसरात स्वच्छता राहावी, यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना तैनात केले जाणार आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे. विधानभवन व परिसरात पाण्याची कमतरता भासणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.