नागपुरात पावसाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:56 AM2018-06-19T11:56:04+5:302018-06-19T11:56:12+5:30
हिवाळी अधिवेशनानंतर यंदा उपराजधानीत ४ जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारी जोरात सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: हिवाळी अधिवेशनानंतर यंदा उपराजधानीत ४ जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारी जोरात सुरू आहे. विधानभवन, रविभवन, नागभवन, राजभवन आदी परिसरात साफसफाई, स्वच्छता, सौंदर्यीकरणासह दुरुस्तीच्या कामाला गती आली आहे. सध्या विधानभवन परिसरात डागडुजी सुरू असून थोडीफार रंगरंगोटीही केली जात आहे. परिसरातील खड्डे बुजवणे, डांबरीकरण करणे आदी कामाला गती आली आहे. जूनच्या अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत.
विधिमंडळ परिसरात ‘रेनप्रूफ ’ व्यवस्था
हवामान विभागानुसार जुलैमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण परिसरात रेनप्रूफ व्यवस्था करण्याचे निर्देश विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिले आहेत. त्यानुसार व्यवस्था केली जात आहे. अधिवेशनकाळात बंदोबस्तातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना रस्त्यावरच तळ ठोकावा लागतो अशात त्यांना पावसाचा फटका बसू शकतो. ही बाब लक्षात घेता ठिकठिकाणी उभारण्यात येणारे टेंट यंदा ‘रेनप्रूफ’ राहणार आहे. याशिवाय पावसापासून बचावासाठी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते इमारतीपर्यंत शेड उभारण्यात येणार आहे.
विधिमंडळ सचिवालय २२ पासून नागपुरात
४ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असले तरी विधिमंडळ सचिवालय मात्र अगोदरच दाखल होत असते. त्यानुसार मुंबईल विधिमंडळ सचिवालय २२ जूनपासून नागपुरात हलविण्यात येणार आहे. परंतु मुंबई मंत्रालयातील काही कर्मचारी मात्र नागपुरात दाखल झाले आहेत. उर्वरित कर्मचारी टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.
बंदोबस्तासाठी ६२०० पोलीस
अधिवेशन काळात बंदोबस्तासाठी राज्यभरातील ६२०० पोलीस अधिकारी-कर्मचारी शहरात दाखल होणार आहेत. या पोलिसांच्या निवासस्थानाची व्यवस्था मंगल कार्यालये, सरपंच भवन आदी ठिकाणी करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई मुख्यालयातून शहरात येणाऱ्या शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेतर्फे अतिरिक्त बोगीची व्यवस्था करण्यात येणार आहे.