रामजन्मोत्सवाची तयारी पूर्ण, आता आदेशाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 11:37 PM2021-03-06T23:37:52+5:302021-03-06T23:39:18+5:30
Preparations for Ramjanmotsava रामनवमीला श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेसंदर्भात अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. शहरात कोरोना संक्रमितांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढविली आहे. मंदिर आणि विविध संस्थांकडून शोभायात्रेसंदर्भातील तयारी पूर्ण झाली आहे. परिस्थिती सुधारताच आणि शासन-प्रशासनाची परवानगी मिळताच, शोभायात्रा साधेपणाने काढली जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामनवमीला श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेसंदर्भात अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. शहरात कोरोना संक्रमितांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढविली आहे. मंदिर आणि विविध संस्थांकडून शोभायात्रेसंदर्भातील तयारी पूर्ण झाली आहे. परिस्थिती सुधारताच आणि शासन-प्रशासनाची परवानगी मिळताच, शोभायात्रा साधेपणाने काढली जाईल. २१ एप्रिल रोजी रामनवमी आहे. दरवर्षी फेब्रुवारीपासून बैठकांचे सत्र सुरू होत असते. मात्र, संक्रमणाच्या सावटात यंदा एकही बैठकांचे आयोजन झालेले नाही.
दरवर्षी श्री रामनवमीच्या पर्वावर श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून विविध संघटनांच्या सहयोगाने श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा काढली जाते. गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे शोभायात्रा रद्द करण्यात आली होती. यंदाची स्थिती कशी असेल, याबाबत ट्रस्टचे पदाधिकारी रामकृष्ण पोद्दार, सुरेश अग्रवाल, सीताराम धंधानिया, महेंद्र पोद्दार, सूरज अग्रवाल, विपिन पोद्दार, पुनित पोद्दार चिंतन करत आहेत.
रामचंद्राचे दर्शन प्रत्यक्ष की ऑनलाइन
सद्य:स्थितीत देवस्थानांमध्ये प्रशासनाच्या नियमानुसार भक्तांना दर्शनाची मुभा दिली जात आहे. वर्तमानातील स्थितीचा वेध घेतला, तर प्रशासनाकडून किमान याच नियमाच्या आधारे भक्तांना दर्शन घेता येईल, असा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे. मास्क, व्यक्तिश: अंतर राखून भक्तांना दर्शनाचा लाभ देता येऊ शकतो. यदाकदाचित भक्तांना प्रवेशाची परवानगी नाकारण्यात आली, तर ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्याचा विचार केला जाणार आहे.
मंदिरात जन्मोत्सव होणार साजरा
संक्रमणाची स्थिती कायम राहिली आणि प्रशासनाचे नियम कठोर झाले, तर गेल्या वर्षीप्रमाणे मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जाईल. यावेळी केवळ धार्मिक अनुष्ठाने पुजारी व ट्रस्टींच्या उपस्थितीत पार पाडले जातील.
परिस्थिती आटोक्यात असेल, तरच कार्यक्रम
विविध संस्था राम जन्मोत्सव शोभायात्रेच्या अनुषंगाने ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. स्थिती स्पष्ट नसल्याने सर्वांनाच प्रशासनाच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. संक्रमणाची स्थिती आटोक्यात असेल, तरच कार्यक्रमांचे आयोजन होतील, अशी भावना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत पालकमंत्री व महापौर यांच्याशीही चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अन्य स्वरूपात राम जन्मोत्सव साजरा करण्यावरही मंथन केले जात आहे.
श्वेत रथ आणि प्रतिकृती सज्ज
गेल्या वर्षी शोभायात्रेसंदर्भात संपूर्ण तयारी झाली होती. ‘पाणी आणि ढग’ विषयावर श्वेत रथ तयार करण्यात आला होता. अन्य प्रतिकृतींचे रथही सज्ज होते, परंतु कोरोना संक्रमणाने शोभायात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. यंदा परवानगी मिळाली, तर ७ ते १० दिवसात रथ व प्रतिकृतींना प्रकाश योजनेसह सज्ज करण्याचा निर्णय घेतला जाईल.