नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील फाशी यार्ड भक्कम करण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 10:58 AM2020-12-23T10:58:10+5:302020-12-23T10:59:35+5:30

Nagpur News Nagpur Central Jail अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार याकूब मेमनच्या फाशीमुळे देश-विदेशात चर्चेला आलेल्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी यार्ड भक्कम करण्याची तयारी सुरू झाली आहे.

Preparations to strengthen the hanging yard at Nagpur Central Jail | नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील फाशी यार्ड भक्कम करण्याची तयारी

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील फाशी यार्ड भक्कम करण्याची तयारी

Next
ठळक मुद्देएक कोटींची प्रशासकीय मान्यतातिहारच्या धर्तीवर होणार नुतनीकरणएक कोटींच्या खर्चाचे बजेट

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार याकूब मेमनच्या फाशीमुळे देश-विदेशात चर्चेला आलेल्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी यार्ड भक्कम करण्याची तयारी सुरू झाली आहे. तिहार कारागृहाच्या धर्तीवर येथील फाशी यार्डचे नुतनीकरण केले जाणार आहे.ब्रिटिश राजवटीत मध्यभारतातील स्वातंत्र्य लढा आक्रमक झाल्याचे पाहून जुलमी इंग्रजांनी १८६४ मध्ये नागपूरला मध्यवर्ती कारागृह उभारले होते. त्यावेळी शेकडो देशभक्तांना या कारागृहात ठेवण्यात आले होते. भक्कम तटबंदी अन् सुरक्षेच्या चांगल्या उपाययोजना असलेल्या देशातील टॉप टेन कारागृहांपैकी एक समजले जाणारे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात इंग्रजांनी निर्मितीपासूनच फाशी यार्ड उभारले होते. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान अनेक देशभक्तांना येथे फाशी देण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर येथे १९८४ आणि २०१५ मध्ये दोषींना फाशी देण्यात आली. या कारागृहाला आता १५६ वर्षे झाली आहे. कारागृहातील अनेक भाग जीर्ण झाल्याने वेळोवेळी तात्पुरती डागडुजी केली जाते.

विशेष म्हणजे, सुरक्षा व्यवस्था खिळखिळी झाल्याचा लाभ उठवत २०१५ मध्ये नागपुरातून ३१ मार्च २०१५ ला बिसेन उईके, मोहम्मद शोएब, सत्येंद्र गुप्ता, नेपाली ऊर्फ प्रेम खत्री आणि गोलू ऊर्फ आकाश ठाकूर हे पाच खतरनाक गुन्हेगार कारागृहातून पळून गेले होते. देशभर खळबळ उडविणाऱ्या या जेलब्रेक नंतर पुन्हा सुरक्षेच्या उपाययोजनांचे दावे केले गेले. तोकड्या उपाययोजनाही केल्या गेल्या. त्यानंतर ४ महिन्यांनी ३० जुलै २०१५ ला याच मध्यवर्ती कारागृहात देश हादरवून सोडणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी आणि दहशतवादी दाऊदचा साथीदार याकूब मेमनला फाशी देण्यात आली. त्यावेळी या कारागृहातील फाशी यार्ड पुन्हा एकदा चर्चेला आला. तेथे भक्कम सुधारणा करण्याची गरज त्यावेळी अधोरेखित झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी फाशी यार्डच्या सुधारणेबाबतचा अहवाल सरकारकडे सादर केला. त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर फाशी यार्डच्या भक्कम सुधारणा अहवालाला मंजुरी मिळाली. सरकारने एक कोटी रुपयाच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या माहितीला दुजोरा देताना लवकरच हे काम सुरू केले जाणार असल्याचे कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी लोकमतला सांगितले.

फाशीचे १२ आरोपी

महाराष्ट्रात फाशी देण्याची व्यवस्था येरवडा पुणे आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहातच आहे. फाशीचे एकूण १२ कैदी या कारागृहात बंदिस्त असून त्यात जर्मन बेकरी तसेच मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या दोषी दहशतवाद्यासह एका महिला आरोपीचाही समावेश आहे. यातील काही जणांची दयेची याचिका राष्ट्रपतीकडे प्रलंबित असल्याचीही माहिती आहे.

Web Title: Preparations to strengthen the hanging yard at Nagpur Central Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग