रुग्णांसाठी मंगलकार्यालये, क्लब ताब्यात घेण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:09 AM2021-04-09T04:09:13+5:302021-04-09T04:09:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’चा प्रकोप प्रचंड वाढला असून रुग्णांना इस्पितळांत खाटा मिळत नसल्याने प्रचंड दुरावस्था होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’चा प्रकोप प्रचंड वाढला असून रुग्णांना इस्पितळांत खाटा मिळत नसल्याने प्रचंड दुरावस्था होत आहे. यासंदर्भात ‘कोरोना’ व्यवस्थापन समितीने काही उपाय सुचविले आहे. ज्या रुग्णांकडे वैद्यकीय दृष्ट्या लक्ष देण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी ‘डे केअर सेंटर’ उभारण्याची गरज आहे. शिवाय गरज भासल्यास या ‘सेंटर्स’साठी शहरातील मंगलकार्यालये, क्लब तसेच शाळांचा ताबा घेण्याचीदेखील तयारी असल्याची माहिती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गुरुवारी दिली.
‘कोरोना’मुळे उपराजधानीत निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेत एक नवीन समिती स्थापन करून तातडीने नियोजित उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. या समितीची बैठक घेऊन त्यात आखलेल्या उपाययोजनांची माहिती गुरुवारी न्यायालयासमोर सादर करण्यात आली. अत्यवस्थ रुग्णांना खाटा मिळत नसल्याने व आॅक्सिजन पुरवठा होत नसल्याने शहरातील ‘कोरोना’मुळे होणाºया मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जे रुग्ण वैद्यकीय दृष्टीकोनातून गंभीर नाहीत मात्र त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठीच ‘डे केअर सेंटर’ उभारण्याचा उपाय सुचविण्यात आला.
सोबतच चाचण्यांमुळे यंत्रणेवरील ताण वाढला आहे. चाचणीचा अहवाल लगेच येत नसल्याने संबंधित काळात ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण अनेकांच्या संपर्कात येतो व त्यामुळे संसर्ग वाढतो आहे. ही बाब लक्षात घेता संशयितांची अगोदर ‘रॅपीड अँटिजेन’ चाचणी करावी. जर त्यात अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला तर ‘आरटीपीसीआर’ करू नये. ‘निगेटिव्ह’ असेल तरच ‘आरटीपीसीआर’ चाचणी करावी. यामुळे यंत्रणेचा वेळ वाचेल, ताण कमी होईल आणि रुग्णाला लवकर उपचारही मिळतील, अशीही सूचना या समितीने केली आहे. समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवर न्यायालयाने समाधान व्यक्त केले.