कोरोना रुग्णांसाठी १२ खासगी रुग्णालये सज्ज ठेवा : नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 09:42 PM2020-04-24T21:42:40+5:302020-04-24T21:44:21+5:30
नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या वाढत आहे. याचा विचार करता बधितांवर उपचार करण्यासाठी शहरातील १२ खासगी रुग्णालयांना २६ एप्रिलपर्यंत सज्ज राहण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या वाढत आहे. याचा विचार करता बधितांवर उपचार करण्यासाठी शहरातील १२ खासगी रुग्णालयांना २६ एप्रिलपर्यंत सज्ज राहण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
नागपूर शहरातील कोविड-१९ रुग्णांचा आकडा शंभरच्या पुढे गेला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु शहरातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याने १२ खासगी रुग्णालयांना या रुग्णांवर उपचारासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व रुग्णालयांची क्षमता १०० बेडहून अधिक आहे. या रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा सुविधा आहेत. तसेच डॉक्टर व परिचारिका यांची सेवा उपलब्ध आहे. यामुळे या रुग्णालयांत बाधितांवर उपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही. याबाबतचे पत्र रुग्णालयांना पाठविण्यात आले आहेत. तर नागपूर शहरातील अन्य ४२ रुग्णालयांची क्षमता ५० ते १०० बेडची आहे.
अशी आहेत १२ रुग्णालये
लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी, श्री राधाकृष्ण हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट वर्धमाननगर, अवंती इन्स्टिट्यूट कॉर्डिओलॉजी धंतोली, ऑरेंज सिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूूट, वोक्हार्ट हॉस्पिटल शंकरनगर चौक, गंगा केअर हॉस्पिटल रामदासपेठ, कुणाल हॉस्पिटल मानकापूर, अॅलेक्सिस हॉस्पिटल मानकापूर, विदर्भ संस्था वैद्यकीय विज्ञान संस्था (व्हीआयएमएस), सेव्हन स्टार हॉस्पिटल ग्रेट नाग रोड, श्री भवानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च पूनापूर, किंग्जवे हॉस्पिटल कस्तूरचंद पार्क आदींचा यात समावेश आहे.