अकरावीच्या प्रवेशाची करा तयारी, आठवडाभरात सुरू हाेईल प्रक्रिया
By निशांत वानखेडे | Published: May 15, 2024 07:00 PM2024-05-15T19:00:03+5:302024-05-15T19:00:43+5:30
केंद्रीय प्रवेश समितीची प्राचार्यांशी बैठक आज : ५४ हजार जागांसाठी हाेणार प्रवेश
नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू हाेण्याची शक्यता आहे. नुकताच सीबीएसई बाेर्डाचा निकाल जाहीर झाला आहे आणि या आठवड्यात राज्य शिक्षण मंडळाचा निकालही जाहीर हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभरात केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू हाेईल, अशी माहिती समितीच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.
शिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ११ वीच्या कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी अभ्यासक्रमाकरिता केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या क्षमतेनुसार यावर्षीही महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वीच्या तिन्ही अभ्यासक्रमाच्या ५४ हजार ५६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेवर सविस्तर मार्गदर्शनासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे गुरुवार, १६ मे राेजी कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक बाेलाविण्यात आली आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, काँग्रेसनगर येथे सकाळी ११ वाजता ही सभा हाेणार आहे. सभेला हजर राहताना मुख्याध्यापक व प्राचार्यांनी आपल्यासाेबत २०२३-२४ शैक्षणिक सत्राच्या संच मान्यतेची प्रत, मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाइन नाेंदणीची प्रत, या सत्राच्या मानधन वाटपाकरिता बॅंक खाते माहितीची नमुनाप्रत, मागील सत्रातील माहितीत बदल असल्यास त्याबद्दलची माहिती व बदल नसल्यास तसे हमीपत्र आणायचे आहे.
सीबीएसई बाेर्डाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात ९५ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे राज्य मंडळाचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. या आठवड्यात ताे जाहीर हाेण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या वर्षी राज्य मंडळाचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती. त्यामुळे या आठवड्यात प्रवेश सुरू हाेतील, अशी अपेक्षा आहे.
रिक्त जागा भरण्याचे आव्हान
गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही २०२४-२५ या शैक्षणिक सत्रासाठी ५४ हजार ५०० जागांसाठी प्रवेश हाेणार आहेत. गेल्या वर्षी विज्ञान शाखेत सर्वाधिक १९,९४८ जागांवर प्रवेश झाले हाेते. त्याखाली वाणिज्य ७९२२ आणि कला शाखेचे ३४४५ जागांवर प्रवेश निश्चित झाले हाेते. एमसीव्हीसीच्या १२४९ जागा भरल्या हाेत्या. असे एकूण ३२,५६४ जागांवर प्रवेश निश्चित झाले हाेते. शेवटच्या राउंडपर्यंत जवळपास २२ हजार जागा रिक्त राहिल्या हाेत्या. या रिक्त जागा भरणे यावर्षीचेही आव्हान ठरणार आहे.