‘स्क्रब टायफस’ प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:30 PM2018-08-29T23:30:41+5:302018-08-30T00:23:02+5:30
वातावरणातील संमिश्र बदलामुळे डेंग्यू, स्वाईन फ्लू व स्क्रब टायफस अशा आजारांनी डोके वर काढले आहे. नागपुरात स्क्रब टायफस या जीवाणुजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी या आजाराचे रुग्ण आढळलेल्या भागात कीटकनाशक फवारणी करावी असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वातावरणातील संमिश्र बदलामुळे डेंग्यू, स्वाईन फ्लू व स्क्रब टायफस अशा आजारांनी डोके वर काढले आहे. नागपुरात स्क्रब टायफस या जीवाणुजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी या आजाराचे रुग्ण आढळलेल्या भागात कीटकनाशक फवारणी करावी असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिले.
स्क्रब टायफस या आजारासंबंधी आरोग्य यंत्रणांचा आढावा घेणारी बैठक बुधवारी उपसंचालक आरोग्य यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल, सहायक संचालक हिवताप डॉ. मिलिंद गणवीर, डॉ.योगेन्द्र बन्सोड यासह आरोग्य यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधीशी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी संवाद साधला.
स्क्रब टायफस या आजाराचा जीवाणु हा उंदीर, घुशी यांच्या अंगावर आढळत असल्याचे सांगून डॉ. दीपक सावंत म्हणाले की, गवत किंवा झुडुपांवरही हा जीवाणु आढळत असल्याचे लक्षात आले आहे. या आजाराची लक्षणे ही ताप येणे, डोके दुखणे अशी आढळतात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
स्क्रब टायफसच्या रुग्णांच्या शरीरावर प्रथमत: खपली किंवा डाग दिसतो. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली या भागातून एकूण २४ संशयित रुग्ण शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. संसर्ग झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अवयवयंत्रणा निकामी झाल्याने आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे.
स्क्रब टायफसचे रुग्ण हे अन्य राज्यातून उपचारासाठी येथे आले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या आजारावर अॅजीथ्रोमायसीन व टॉक्सीसायक्लीन ही औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
शहरात कीटकनाशकांची फवारणी करण्याच्या सूचना त्यांनी महापलिकेच्या अधिकाऱ्याांना दिल्यात. स्क्रब टायफस सोबतच डेंग्यू, स्वाईन फ्लू, मलेरिया या आजाराला पायबंद घालण्यासाठी नागरिकांनी देखील प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शहरातील उदवाहनांमध्ये व होर्डिंगद्वारे देखील या आजाराविषयी जाणीव जागृती करणारे प्रचार साहित्य लावण्याची सूचना यावेळी मंत्री महोदयांनी आरोग्य यंत्रणांना केली. स्क्रब टायफस या आजारामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी त्यांनी केले.
मेडिकलमध्ये सहा रुग्ण गंभीर
दरम्यान, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मेडिकलला भेट दिली. मेडिकलमध्ये स्क्रब टायफसचे एकूण ११ रुग्ण भरती असून, यापैकी ६ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉ. सावंत यांनी या रुग्णांचीही माहिती जाणून घेतली. यावेळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित होते.