मान्सून लक्षात घेऊन तयारी करा : पालकमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 09:19 PM2020-05-29T21:19:17+5:302020-05-29T21:20:49+5:30
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेतील उत्तम समन्वयाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णवाढीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. परंतु आता मान्सून सक्रिय होत आहे. तेव्हा पावसाळा लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेतील उत्तम समन्वयाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णवाढीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. परंतु आता मान्सून सक्रिय होत आहे. तेव्हा पावसाळा लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी जिल्हास्तरीय आढावा बैठक बोलावण्यात आली होती. त्यात त्यांनी उपरोक्त सूचना केल्या. बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक राकेश ओला आदी उपस्थित होते.
खासगी रुग्णालयांवर ठेवा लक्ष
खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्याबाबत असलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, याबाबतची अद्ययावत माहिती सर्व संबंधित यंत्रणांनी ठेवावी. शासकीय वैद्यकीय रुग्णालये व महानगरपालिकेची रुग्णालये असली तरीही भविष्यात खासगी रुग्णालये शासकीय दरांमध्ये रुग्णांच्या सेवेत कायम सुरु ठेवण्याची सक्ती करावी.
कन्टेन्मेंट झोनमधील रुग्णांना तात्काळ भरती करावे
यावेळी पालकमंत्र्यांनी कन्टेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवांना वगळले असले तरीही कोरोनाबाधित रुग्णांसह इतर आजाराच्या रुग्णांनाही तात्काळ रुग्णालयांत दाखल करण्यासाठी सूट द्यावी, असे निर्देश दिले.