पेट्राेकेमिकल काॅम्प्लेक्सची टेक्नाे फिजिबिलिटी रिपाेर्ट तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:07 AM2021-07-25T04:07:18+5:302021-07-25T04:07:18+5:30
नागपूर : पेट्राेकेमिकल काॅम्प्लेक्स निर्मितीवरून विदर्भात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ...
नागपूर : पेट्राेकेमिकल काॅम्प्लेक्स निर्मितीवरून विदर्भात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात केंद्रीय पेट्राेलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांना पत्र लिहून काॅम्प्लेक्सची टेक्नाे फिजिबिलिटी रिपाेर्ट (व्यवहार्यता अहवाल) तयार करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली. याशिवाय पटेल यांनी नागपुरात नाइपर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च) ची स्थापना त्वरित करण्याची मागणी केंद्रीय आराेग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्राद्वारे केली आहे.
पटेल यांनी पुरी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राज्य विधानसभेचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच वेदच्या प्रतिनिधी मंडळाची तत्कालीन पेट्राेलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासाेबत झालेल्या बैठकीदरम्यान टेक्नाे फिजिबिलिटी रिपाेर्ट तयार करण्याची घाेषणा झाल्याचे नमूद केले आहे. पेट्राेकेमिकल काॅम्प्लेक्समुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाेबतच त्यांनी आराेग्यमंत्र्यांना नाइपरच्या स्थापनेबाबत मागणी केली आहे. २०१७ च्या अर्थसंकल्पात नाइपरच्या स्थापनेची घाेषणा झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. मात्र यासंदर्भात पुढे कुठल्याही हालचाली न झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. या संस्थेसाठी मिहानमध्ये आवश्यक मूलभूत सुविधांसह जागा उपलब्ध असल्याचेही पटेल यांनी पत्रामधून स्पष्ट केले.