उपराजधानीत सुरक्षा यंत्रणा सज्ज
By admin | Published: September 23, 2015 06:19 AM2015-09-23T06:19:23+5:302015-09-23T06:19:23+5:30
याकूब मेमनच्या फाशीनंतर मिळालेल्या धमक्यांच्या अनुषंगाने सणासुदीच्या दिवसात उपराजधानीत घातपात किंवा जातीय
नरेश डोंगरे ल्ल नागपूर
याकूब मेमनच्या फाशीनंतर मिळालेल्या धमक्यांच्या अनुषंगाने सणासुदीच्या दिवसात उपराजधानीत घातपात किंवा जातीय दंगलीसारखा प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा दलाकडून खास खबरदारीच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) बिपीनकुमार बिहारी येथे आले असून पुढचे आठ दिवस ते नागपुरातच तळ ठोकून राहणार आहे. या कालावधीत आत्मघाती हल्ला किंवा जातीय दंगलीसारखा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीच्या कोणत्या उपाययोजना करायच्या त्यासाठी सुरक्षा यंत्रणा कामी लागली आहे.
मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला नागपुरात फाशी देण्यात आल्यामुळे टायगर मेमनने थेट पाकिस्तानातूनच ‘अंजाम भुगतने को तय्यार रहो‘ अशी धमकी दिली होती. त्यानंतर पाकिस्तानातून भारतात पाठविण्यात आलेल्या नावेदसह अनेक दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतरही अनेक दहशतवादी भारतात शिरल्याचा अंदाज आहे. दहशतवादी संघटनांचे स्लीपर आधीपासूनच देशातील विविध प्रांतात आणि मुंबई, दिल्लीसह अनेक महानगरात कार्यरत असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून घातपात घडवून आणण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी यापूर्वी अनेकदा वर्तविली आहे. सणोत्सवात जागोजागी गर्दी असते. अशा वेळी दहशतवाद्यांना त्यांचे इप्सित साध्य करणे शक्य होते. नागपूर अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर अव्वलस्थानी आहे. येथे याकूबला फाशी देण्यात आल्यापासून घातपाताचा धोका अधिकच वाढला आहे. गणेशोत्सवामुळे ठिकठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेता उपराजधानीत घातपात घडवून आणण्याची तयारी दहशतवादी संघटनांनी चालविल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याची चर्चा आहे. गणेशोत्सवादरम्यानच ईद आल्यामुळे घातपात किंवा जातीय दंगलीचा धोका अधिक तीव्र असल्याचे बोलले जाते. त्याचमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा खडबडून कामाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर, एडीजी (अतिरिक्त पोलीस महासंचालक) स्पेशल आॅपरेशन, बिपीनकुमार बिहारी सोमवारी नागपुरात पोहचले. त्यांनी स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बैठका, चर्चा करून त्यांना आवश्यक ते निर्देश दिले. बुधवारी पुन्हा ते निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. दरम्यान, दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) स्थानिक कार्यालयातही मंगळवारी धावपळ होती. या संबंधाने प्रस्तुत प्रतिनिधीने एडीजी बिहारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘असे काहीही नाही‘ म्हटले.
गर्दी अन् धोका
सूत्रांच्या माहितीनुसार, २५, २६, २७ आणि २८ हे चार दिवस धोक्याचे आहेत. २५ ला ईद असून, २७ ला अनंत चतुर्दशी आहे. २७ आणि २८ ला विसर्जनाची धूम असते. या दोन दिवसांत मिरवणुका निघतात. विसर्जनाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. त्याचा गैरफायदा उचलून दहशतवादी आपल्या कलुषित मनसुब्यांना पूर्ण करण्याचे प्रयत्न करू शकतात.
दयाल यांची दक्षता
राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात राज्यात कोणती घातपाताची घटना घडली तर त्यांच्या कारकिर्दीवर ठपका लागेल. ते टाळण्यासाठी दयाल सर्वच प्रकारची दक्षता घेत आहेत. येथील पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांनी एडीजी बिहारी यांना पाठविल्याचेही वरिष्ठ अधिकारी सांगतात.