एक महिन्यापासून ओलिस नाट्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:06 AM2021-06-06T04:06:58+5:302021-06-06T04:06:58+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बिल्डरच्या कुटुंबीयांना तब्बल दोन तास ओलिस ठेवून उपराजधानीत खळबळ उडवून देणारा आरोपी ...
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिल्डरच्या कुटुंबीयांना तब्बल दोन तास ओलिस ठेवून उपराजधानीत खळबळ उडवून देणारा आरोपी जितेंद्र तुळशीराम बिसेन याला ५० लाखांची खंडणी सहज मिळेल, असा ओव्हर कॉन्फिडन्स होता. त्यामुळेच त्याने खंडणीसाठी एक महिन्यापासून ओलिस नाट्याची तयारी केली होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून पुढे आली होती. अवघे नववीपर्यंतचे शिक्षण घेतलेला १९ वर्षीय बिसेन पोलिसांच्या मते कमालीचा धूर्त आहे. त्याचा एक अल्पवयीन नातेवाईक सराईत चोरटा असून, त्याच्यावर ८ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी पकडल्यानंतरही अल्पवयीन असल्याने त्याला कारागृहात जावे लागत नाही किंवा कठोर कारवाईदेखील होत नाही. मात्र, तो छुटपुट चोऱ्या करतो. त्यामुळे त्याला फारसा मालही मिळत नाही. त्यामुळे आपण एकच मोठा हात मारायचा. ५० लाख रुपये मिळाले की, २० लाखांत बंगला (?) घ्यायचा. ५ ते ७ लाखांत कार घ्यायची आणि उर्वरित पैशात राजेशाही जीवन जगायचे, अशी त्याची भ्रामक कल्पना होती. त्यामुळे तो सावज कोणते हेरायचे, यावर सारखा विचार करायचा. एक महिन्यापूर्वी कुण्या एका निमित्ताने बिल्डर राजू वैद्य त्याच्या डोळ्यासमोर आला अन् त्यांच्याकडेच हात मारायचा, असा विचार त्याने पक्का केला. गुन्हा करताना कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून तो महिनाभरापासून वारंवार आपल्या प्लॅनवर विचार करीत होता. त्याने काही क्राइम पेट्रोलचेही सीन बघितले. त्यावरून कपडे कसे घालायचे आणि मोबाइल स्वत:चा वापरायचाच नाही, हे दोन मुद्दे त्याने आपल्या गुन्ह्यात अमलात आणले. मोबाइल जर वापरला, तर पोलीस कधी ना कधी ट्रेस करतातच, त्यामुळे त्याने आपला एण्ड्रॉइड मोबाइल या गुन्ह्यात वापरलाच नाही. त्याऐवजी त्याने स्वातीच्या मोबाइलवरूनच राजू वैद्य यांच्याशी बोलणी करून खंडणीची मागणी केली. वैद्य यांचे सहकारी म्हणून पाचशेंच्या नोटांचे बंडल पोलीस त्याच्या हातात ठेवत होते. (त्याने दोन्ही हात बाहेर काढले की, त्याला पकडायचे, अशी त्यामागे पोलिसांची योजना होती.) ते पाहून त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. एवढ्या नोटा त्याने पहिल्यांदाच बघितल्या होत्या. त्यामुळे त्याने बाहेर पडल्यानंतर काय करायचे, याचेही स्वप्न रंगविणे सुरू केले होते. त्यामुळे तो काहीसा गाफीलही झाला होता. त्याचा गाफीलपणा पोलिसांच्या कारवाईचाच एक भाग होता. त्याचमुळे त्याला पकडणे सोपे झाले. त्याची गचांडी पकडून एक मोठा गुन्हा टाळल्याबद्दल शहर पोलिसांचे आणि विशेषत: गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, तसेच त्यांचे सहकारी एपीआय भुजबळ, एपीआय सोनटक्के, कर्मचारी मडावी आणि राऊत यांचे सर्व स्तरांतून विशेष अभिनंदन केले जात आहे.
---
पोलिसांच्या ‘खातरदारीतही’ तो बेदरकारच
पोलिसांनी आरोपी बिसेनला अटक केल्यानंतर त्याची जबरदस्त ‘खातरदारी’ केली. त्याही स्थितीत तो बेदरकारच होता. ‘मला असे माहीत असते तर त्यांना सोडलेच नसते’, अशी बेदरकार भाषा त्याने पोलिसांकडे वापरली आहे. आपण मरण्या- मारण्याच्या तयारीनेच आतमध्ये गेलो होतो, असेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. हा गुन्हा करण्यासाठी बिसेनने वैद्य यांच्या निवासस्थानाची महिनाभरात दोन वेळा रेकी केली होती, असेही सांगितले आहे.
---
दोन दिवसांपूर्वीच पोलिसांशी सामना
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याकडे चार दिवसांपूर्वी चार लाखांची रोकड अन् सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले. आरोपीचा अल्पवयीन नातेवाईक ‘रेकॉर्ड’वरचा गुन्हेगार असल्याने पोलिसांनी चाैकशीसाठी त्याच्या घरी धडक दिली. यावेळी आरोपी जितेंद्र बिसेनसोबत पोलिसांचा सामना झाला. मात्र, पोलिसांना विचारलेल्या प्रश्नांचा त्याने त्यावेळी अत्यंत साळसूदपणे सामना केला होता. दरम्यान, हुडकेश्वरचे ठाणेदार प्रतापराव भोसले यांनी बिसेनला शनिवारी न्यायालयात हजर करून त्याचा ८ जूनपर्यंत पीसीआर मिळवला.
---