जनविराेध माेडून अजनीवनातील ४५०० झाडे कापण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:14+5:302021-05-31T04:07:14+5:30
नागपूर : काेराेना महामारीच्या भीषण काळात ऑक्सिजनचे माेल बहुतेकांना कळले, पण काहींना मात्र अजूनही कळलेले दिसत नाही. ऑक्सिजनसाठी प्लान्ट ...
नागपूर : काेराेना महामारीच्या भीषण काळात ऑक्सिजनचे माेल बहुतेकांना कळले, पण काहींना मात्र अजूनही कळलेले दिसत नाही. ऑक्सिजनसाठी प्लान्ट लावण्याची धडपड हाेताना फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची किंमत केली जात नाही. हाेय, पर्यावरणप्रेमींची आंदाेलने व प्रचंड जनविराेध असताना विराेधाला न जुमानता प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पासाठी अजनीवनातील ४५२२ झाडे कापण्याची नाेटीस महापालिकेने जाहीर केली आहे.
मनपाच्या उद्यान विभागाने रविवारी झाडे कापण्याबाबतची नाेटीस वर्तमानपत्रात प्रकाशित केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या अर्जावर ४५२२ झाडे कापण्याची व प्रत्याराेपण करण्याची ही नाेटीस आहे. वृक्षताेडीविराेधात आक्षेप असणाऱ्यांनी सात दिवसांत उद्यान विभागाला लेखी तक्रारी देण्याचे आवाहन या जाहिरातीमध्ये केले आहे. याचाच अर्थ जनविराेध डावलून विविध प्रजातींची हजाराे झाडे कापण्याची तयारी मनपाच्या माध्यमातून एनएचएआयने चालविली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर शांत राहिलेल्या पर्यावरणप्रेमींमध्ये पुन्हा असंताेष पसरला आहे. विशेष म्हणजे काेराेनामुळे लाॅकडाऊन लागलेला असताना मनपाने ऑनलाइन तक्रार नाेंदणीची व्यवस्था न करता प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा अट्टाहास करणे म्हणजे धाेक्याला आमंत्रण देण्यासारखे असल्याचा आराेप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या जाहिरातीवरून अनेक माेठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे एनएचएआय व मनपालाही द्यावे लागणार आहेत. दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी कुठल्याही परिस्थितीत विराेध नाेंदविण्याचा निर्धार जाहीर केला आहे.
- झाडांच्या संख्येवर संभ्रम : नाेटीसमध्ये ४५२२ झाडे कापण्याची माहिती आहे. एनएचएआयने सुरुवातीला १९०० झाडे सांगितली हाेती. पर्यावरणवाद्यांनी ७००० च्यावर. त्यानंतर उद्यान विभागाच्या माेजणीत ६५०० च्यावर झाडे आढळली व १०००० असण्याची शक्यता वर्तविण्यात आली हाेती. त्यामुळे काेणत्या आधारावर माेजणी झाली? झाडांच्या वयानुसार की बुंध्याची रुंदी कमी करून, हे उत्तर मिळणे अपेक्षित आहे.
- ही वृक्षताेड पहिल्या टप्प्यातील आहे की चारही टप्प्यांसाठी आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
- या आधारावर एनएचएआयला २० ते २२ हजार झाडे लावणे बंधनकारक ठरते. त्यामुळे एनएचएआयने कम्पेनसेटरी वृक्षाराेपणाची याेजना आखली का? आखली असेल तर ही झाडे कुठे लावणार आहेत?
- यापूर्वीच झाडांचे प्रत्याराेपण अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे अजनीवनातील झाडांचे प्रत्याराेपण यशस्वी हाेण्यावर शंका आहे.