नागपुरात निवासी डॉक्टरांना प्रिस्क्रीप्शन नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:59 AM2019-09-11T10:59:58+5:302019-09-11T11:00:21+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रुग्णांना बाहेरून औषधे किंवा चाचण्या लिहून देताना केवळ वरिष्ठ डॉक्टरांनीच प्रीस्क्रीप्शन लिहून द्यावे, निवासी डॉक्टरांनी ते लिहून देऊ नये, हे नवे आदेश मेडिकल प्रशासनाने काढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रुग्णांना बाहेरून औषधे किंवा चाचण्या लिहून देताना केवळ वरिष्ठ डॉक्टरांनीच प्रीस्क्रीप्शन लिहून द्यावे, निवासी डॉक्टरांनी ते लिहून देऊ नये, हे नवे आदेश मेडिकल प्रशासनाने काढले आहेत. यामुळे वरिष्ठ औषधे उपलब्धेकडे लक्ष देऊ लागले आहेत. परिणामी, रुग्णांना काही प्रमाणात औषधे मिळू लागली आहेत शिवाय, रुग्णालयातच चाचण्या तपासण्यांची संख्याही वाढली आहे. असे असले तरी, प्रीस्क्रीप्शन लिहिण्याचे अधिकार असलेले डॉक्टर २४ तास सर्वच विभागात उपस्थित असतीलच असे नाही, अशावेळी औषधीविना रुग्णाचा जीव गेल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मेडिकलमधील रुग्णांना औषधांसोबतच चाचण्यांसाठीही बाहेर पाठविले जात असल्याच्या तक्रारी होत्या. याची दखल घेत अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी नवे आदेश काढले. निवासी डॉक्टरांनी रुग्णांना बाहेरून औषधे लिहून देऊ नये, असे सर्व विभागप्रमुखांना लेखी पत्र दिले. प्रीस्क्रीप्शन लिहून देण्याचे अधिकार सहायक प्राध्यापकांपासून ते प्राध्यापकांना आहेत, असेही त्यात नमूद केले. निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने या आदेशाचे स्वागत केले. स्वत: ‘मार्ड’ने आपल्या सर्व निवासी डॉक्टरांना या आदेशाचे पालन करण्याचा सूचना केल्या. यामुळे त्या त्या विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांना लागणारी औषधे उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देणे सुरू केले. यामुळे स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याचे प्रमाणही वाढले. रुग्णांना औषधांसाठी बाहेर पिटाळणे कमी झाले. चाचण्यांच्या संदर्भातही असेच झाले. रुग्णांना याचा लाभ मिळत असल्याचेही चित्र आहे. परंतु रुग्णालयात एकीकडे औषधांचा तुटवडा असताना आणि स्त्रीरोग व प्रसूती विभाग, बधिरीकरण विभाग व काही प्रमाणात शल्य चिकित्सा विभाग सोडल्यास इतर सर्व विभागात २४ तास वरिष्ठ डॉक्टर राहतच नाही. अशावेळी गंभीर रुग्णाला औषधे कुणी लिहून द्यावी, हा प्रश्न आहे.
२४ तास ड्युटी लावण्यावर विचार
प्रशासनाने आदेश काढण्यापूर्वी सर्व विभागातील वरिष्ठ डॉक्टरांची २४ तास ड्युटी व पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध करून द्यायला हवा होता, असे बालले जात आहे. मेडिकल प्रशासन हा प्रायोगिक स्तरावरील निर्णय असल्याचे सांगत आहे. परंतु त्यांच्याकडेही या विषयातील तक्रारी पोहचल्या आहेत. यामुळे सहायक प्राध्यापकांना ‘आॅन कॉल’ न ठेवता त्यांची २४ तास ड्युटी लावण्यावर विचार सुरू आहे.