विदर्भात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:47+5:302021-07-23T04:06:47+5:30
नागपूर : मागील दाेन दिवसापासून विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वच जिल्ह्यात जाेरदार पाऊस हाेत आहे. नागपूर विभागातील ...
नागपूर : मागील दाेन दिवसापासून विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वच जिल्ह्यात जाेरदार पाऊस हाेत आहे. नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यात दाेन दिवसात १८८ मिमि पावसाची नाेंद करण्यात आली. विदर्भात अकाेला जिल्ह्यात सर्वाधिक २०२ मिलिमीटर पाऊस नाेंदविण्यात आला. दरम्यान हवामान विभागाने चंद्रपूर आणि गडचिराेली जिल्ह्यात पुढचे दाेन दिवस रेड अलर्ट तर नागपूर, वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
काही दिवस दडी मारल्यानंतर बुधवारी सकाळपासूनच पावसाने जाेर धरला. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप कायम हाेती. सायंकाळी थाेडी उसंत घेतल्यानंतर रात्री पुन्हा पावसाचा जाेर वाढला. हवामान विभागाने गुरुवारी सकाळपर्यंत नागपूर शहरात ३६ मिमि तर जिल्ह्यात भिवापूर येथे सर्वाधिक ८७.१ मिमि पावसाची नाेंद केली. शहरात कमाल २६ तर किमान २४ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. विदर्भात अकाेला जिल्ह्यात सर्वाधिक २०२ मिमि पावसाची नाेंद झाली. नागपूर व अकाेला या दाेन्ही जिल्ह्यात पुढच्या २४ तासात जाेरदार म्हणजे ६५ ते ११५ मिमिपर्यंत पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यात मुसळधार पाऊस हाेण्याचा अंदाज असून विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. २४ तासात पाऊस २०० मिमिच्या पार जाण्याची शक्यता असून पुढचे दाेन दिवस अधिक सतर्क राहण्याची सूचना या भागातील नागरिकांना देण्यात आली आहे.
जुलै महिन्यात या काळात नागपूर विभागात सरासरी २५७ मिमि पावसाची नाेंद केली जाते. मात्र गेले काही दिवस पावसाने दडी मारली हाेती. दाेन दिवस सुरू असलेल्या पावसाने थाेडी तूट भरून काढली. विभागात आतापर्यंत १८८ मिमि पावसाची नाेंद करण्यात आली व येत्या काळात २२० मिमि पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.