‘एमआर’च्या उपस्थितीत रुग्ण तपासणी
By admin | Published: May 22, 2017 11:07 PM2017-05-22T23:07:32+5:302017-05-22T23:07:32+5:30
विविध औषध कंपन्यांच्या वैद्यकीय प्रतिनिधींनी (एमआर) डॉक्टरांना बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) भेटू नये, असा नियम आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 22 - विविध औषध कंपन्यांच्या वैद्यकीय प्रतिनिधींनी (एमआर) डॉक्टरांना बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) भेटू नये, असा नियम आहे. परंतू या नियमाला ठेंगा दाखवीत ‘एमआर’ ओपीडीमध्येच गर्दी करतात. डॉक्टर रुग्ण तपासत असताना, त्यांना आपल्या औषधांची माहिती देतात. हे धक्कादायक चित्र आहे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो). विशेष म्हणजे, ‘एमआर’कडून आवश्यक औषधे, कूपन व भेटवस्तू मिळत असल्याने संबंधित डॉक्टरही याला विरोध करीत नसल्याने या ‘एमआर’ मंडळीचे चांगलेच फावत असल्याचे चित्र आहे.
खासगी रुग्णालयात वैद्यकीय प्रतिनिधीना(एमआर)रुग्ण तपासण्याच्या वेळेत येण्याला प्रतिबंध आहे. आठवड्यातील एक दिवस व ठराविक वेळ त्यांच्यासाठी राखीव असते. मात्र शासकीय रुग्णालयांसाठी हा नियमच नाही. ‘एमआर’ने कधीही यावे, कोणालाही भेटावे, तासन्तास डॉक्टरांचा वेळ घ्यावा, हा प्रकार सर्रास सुरू आहे. मेयो रुग्णालयाच्या ओपीडीची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजताची आहे. आठवड्याचा पहिला दिवस सोमवार, हा अनेक वरिष्ठ डॉक्टरांचा ओपीडीचा दिवस असल्याने रुग्णांची गर्दी उसळते. ‘एमआर’ही दुपारी १२ वाजेपासून रुग्ण तपासण्याच्या खोलीत गर्दी करतात. डॉक्टरांकडे वेळ नसल्याने तेही रुग्ण तपासत ‘एमआर’शीही संवाद साधतात. सोमवारी हा प्रकार एका त्रस्त रुग्णाच्या नातेवाईकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून ‘लोकमत’ला पाठविले.
त्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून पत्नीला बरे नव्हते म्हणून सोमवारी मेयोच्या ओपीडीतील ‘मेडिसीन’च्या १५ क्रमांकाच्या खोलीत पत्नीला घेऊन गेलो. येथे आधीच‘एमआर’ची गर्दी होती. डॉक्टर महिला रुग्ण तपासत असताना त्यांना घेराव घातल्यासारखे ‘एमआर’ उभे होते. यातील बहुसंख्य पुरुष होते. पत्नीचा नंबर आला तेव्हा एका एमआरने औषधांची माहिती देणे सुरू केले होते. त्याचे संपल्यानंतर डॉक्टरने पत्नीला स्टुलवर बसवून तपासायला सुरुवात केली, त्याचवेळी दुसºया एमआरने माहिती द्यायला सुरुवात केली. त्याचे बोलके छायाचित्र मोबाईलने काढले; नंतर इतरही रुग्णांसोबत असेच झाले.
-ओपीडीत ‘एमआर’ना प्रवेशबंदी
तत्कालीन अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांनी ‘एमआर’ला डॉक्टरांना भेटायचे असल्यास ओपीडीत न भेटता त्यांच्या विभागाच्या कक्षात भेटावे, असे निर्देश दिले होते. परंतु त्यांची बदली होताच ‘एमआर’ची ओपीडीत गर्दी वाढली. याकडे प्रभारी अधिष्ठात्यांसोबतच वैद्यकीय अधीक्षकांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.