नागपूर, चंद्रपुरात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:10 AM2021-05-05T04:10:52+5:302021-05-05T04:10:52+5:30
नागपूर : हवामान विभागाने या आठवड्यात ६ आणि ७ मे हे दोन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला ...
नागपूर : हवामान विभागाने या आठवड्यात ६ आणि ७ मे हे दोन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, नागपूर, अमरावती, चंद्रपुरात मागील २४ तासात पावसाने हजेरी लावली. यामुळे तापमान खाली आले.
नागपूर शहरात सोमवारी दुपारी जोराचा वारा सुटला. त्यानंतर काही भागामध्ये पाऊसही आला. सकाळी ढगाळलेले वातावरण होते. दुपारी कडक उन्ह पडल्यावरही नंतर आभाळ भरून आले व पाऊसही आला. शहरात गेल्या २४ तासात ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. सकाळी आर्द्रता ५५ टक्के होती. दुपारी बरीच घटली. मात्र सायंकाळी पावसानंतर ती ६६ टक्के नोंदविण्यात आली. रविवारी सायंकाळी आणि रात्रीही शहरातील काही भागात वादळ झाले. नुकसानीचे वृत्त नाही.
विदर्भात गेल्या २४ तासात अमरावतीमध्ये १.४ मिली पावसाची नोंद झाली. वाशिममध्ये २ मिली तर बुलडाण्यामध्ये ३० मिली पाऊस पडला. या सोबतच, चंद्रपुरातही रविवारी रात्री मेघगर्जनेसह सुमारे पाऊण तास पाऊस पडला. नागपूर शहरातही रात्री पावसाने हजेरी लावली होती.
वेधशाळेने ६ आणि ७ मे हे दोन दिवस पावसाचे सांगितले आहेत. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. बदललेल्या वातावरणामुळे ऐन मे पहिन्यात तापमानाचा पारा खालावला आहे. सोमवारी दिवसभरात वर्धा आणि यवतमाळ येथे ४०.५ आणि ४०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती आणि चंद्रपुरात ३९.४, वाशिममध्ये ३९.२, नागपुरात ३९.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. भंडारा आणि गोंदियामध्ये अनुक्रमे ३७.५ व ३७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर गोंदियात ३८.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली.