नागपूरला लॉजिस्टिक हब म्हणून सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:43 AM2017-10-08T01:43:16+5:302017-10-08T01:43:25+5:30
नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असून कॉर्पोरेट क्षेत्रासमोर लॉजिस्टिक हबच्या स्वरूपात सादर करण्याचे आवाहन या क्षेत्रातील विशेषज्ञांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असून कॉर्पोरेट क्षेत्रासमोर लॉजिस्टिक हबच्या स्वरूपात सादर करण्याचे आवाहन या क्षेत्रातील विशेषज्ञांनी येथे केले.
विदर्भ एकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) वतीने शनिवार, ७ आॅक्टोबरला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये ‘नागपूर उदयास येणारे लॉजिस्टिक हब’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आ. आशिष देशमुख, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, उपाध्यक्ष शिवकुमार राव, प्रदीप माहेश्वरी, महासचिव राहुल उपगन्नलावार, गोविंद डागा, कोईग्न कन्सलटिंगचे संस्थापक संचालक आरिफ सिद्दिकी, डिस्ट्रिब्यूशन लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक के. सत्यनाथन, रिव्हिगोचे व्यावसायिक प्रमुख संबित सत्पथी उपस्थित होते.
उद्घाटन सत्रात आरिफ सिद्दिकी यांनी सांगितले की, भौगौलिकदृष्टीने नागपूर देशाच्या केंद्रस्थानी आहे.
त्यानंतरही नागपूर सकारात्मक वातावरणाअभावी लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठी गुंतवणूकदार आकर्षित करू शकले नाही. सकारात्मक वातावरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि कुशल मानव संसाधनाच्या निर्मितीची गरज आहे. त्यानंतरच गुंतवणूकदार आकर्षित होऊन नागपूर लॉजिस्टिक हब बनू शकते.
यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रासमोर नागपूरला लॉजिस्टिक्स हबच्या स्वरुपात सादर करावे लागेल. जीएसटी लागू झाला आहे. पण त्याचे फायदे वर्षानंतर दिसून येतील.
के. सत्यनाथन यांनी सांगितले की, दक्षिण नागपुरात आधुनिक सुविधायुक्त लॉजिस्टिक्स झोन बनविण्याची गरज आहे. झोनमध्ये निवासी कॉलनी बनविण्याची परवानगी देऊ नये. तसेच माथाडी कायद्यांतर्गत आवश्यक सूट मिळाली पाहिजे.
सरकारला अधिग्रहित जमिनीच्या ‘चेंज आॅफ लँड यूज’करिता (सीएलयू) शुल्क व कर कमी करणे, आवश्यक मंजुरीसाठी एकल खिडकी योजना राबविण्याची गरज आहे. यावेळी संबित सत्पथी यांनी मार्गदर्शन केले.