व्यंगचित्र प्रदर्शनाचा पुरस्कार वितरण समारंभ आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2016 02:58 AM2016-05-08T02:58:29+5:302016-05-08T02:58:29+5:30
लोकमत समूहाच्यावतीने जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून ‘लक्ष्मण’रेषा व्यंगचित्र प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, रामदासपेठ येथे करण्यात आले.
व्यंगचित्रांच्या कार्यशाळेने रंगत :
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचा उपक्रम
नागपूर : लोकमत समूहाच्यावतीने जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून ‘लक्ष्मण’रेषा व्यंगचित्र प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, रामदासपेठ येथे करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ४ मे रोजी करण्यात आले. या प्रदर्शनाचा समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा ८ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दर्डा आर्ट गॅलरीत होईल. प्रदर्शनात व्यंगचित्र प्रदर्शित करणाऱ्या श्रेष्ठ व्यंगचित्रकारांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. या समारंभाला माजी खा. बनवारीलाल पुरोहित प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा राहतील.
नवोदित व्यंगचित्रकारांना मंच
नागपूर : रविवारच्या कार्यक्रमाला सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांना प्रामुख्याने आमंत्रित करण्यात आले आहे. विदर्भातील व्यावसायिक आणि नवोदित व्यंगचित्रकारांना मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन लोकमतने केले होते. या प्रदर्शनाला विदर्भातील व्यंगचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाच; पण रसिकांनीही मोठ्या संख्येने या प्रदर्शनाचा लाभ घेत व्यंगचित्र समजून घेण्याचा आनंद घेतला. प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यावसायिक व्यंगचित्रकारांनी नवोदितांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यामुळे रोज व्यंगचित्रकारांसाठी कार्यशाळा झाली. व्यंगचित्रांकडे एका वेगळ्या वैचारिक दृष्टीने पाहण्याची नजर या प्रदर्शनामुळे लाभल्याचे समाधान रसिकांनी व्यक्त केले. याशिवाय व्यंगचित्र कसे काढावे, याचे ज्ञान या प्रदर्शनातून मिळाल्याचे मत व्यंगचित्रकारांनी व्यक्त केले. यानिमित्ताने सर्व व्यंगचित्रकार एकत्रित आले. या महत्त्वाच्या ठरलेल्या आणि कलाक्षेत्राला ऊर्जितावस्था देणाऱ्या प्रदर्शनाच्या समारोपाला आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्व चित्ररसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे समन्वयक अमित गोनाडे यांनी केले आहे.