राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवस नागपुरात, नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही सहभागी होणार

By जितेंद्र ढवळे | Published: November 30, 2023 04:49 PM2023-11-30T16:49:09+5:302023-11-30T16:49:53+5:30

मेडिकलच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन करणार

President Draupadi Murmu will be in Nagpur for two days and will also attend the convocation ceremony of Nagpur University. | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवस नागपुरात, नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही सहभागी होणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवस नागपुरात, नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही सहभागी होणार

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ व २ डिसेंबर रोजी नागपुरात येत आहेत.

शुक्रवार, दि.१ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींचे पुणे येथून सकाळी १२:१० वाजता नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन होईल. विमानतळावर स्वागत स्वीकार करून दुपारी १२:२० वाजता त्या राजभवन येथे जातील. यानंतर दुपारी ३:१० वाजता राष्ट्रपती नागपुरातील कुकडे ले-आउट येथील श्री जगन्नाथ मंदिराला भेट देतील. याठिकाणी दर्शन व आरतीत सहभागी होतील. यानंतर दुपारी ४:०० वाजता मेडिकलच्या परिसरात आयोजित अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर राजभवनकडे प्रयाण व मुक्काम करतील.

शनिवार दि. २ डिसेंबर रोजी राष्ट्रपती सकाळी १०:१० वाजता राजभवन येथून कविवर्य सुरेश भट सभागृहाकडे रवाना होतील. येथे सकाळी १०:३० ते ११:३० वाजेपर्यंत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १११ व्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. यानंतर सकाळी ११:४५ वाजता विमानतळाकडे प्रयाण करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळाहून भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सकाळी ११:४५ वाजता राष्ट्रपतींचे दिल्लीकडे प्रयाण होईल.

राज्यपाल रमेश बैसही येणार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दोन्ही कार्यक्रमांत राज्यपाल रमेश बैस हेही सहभागी होतील. शुक्रवार, १ डिसेंबर रोजी राज्यपालांचे पुणे येथून सकाळी १२:१० वाजता नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होणार आहे. विमानतळावरील राष्ट्रपतींच्या स्वागतानंतर दुपारी १२:२० राजभवनकडे राज्यपालांचे प्रयाण होईल. यानंतर दोन्ही दिवस ते राष्ट्रपतींच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील. राज्यपालांचे दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता नागपूर विमानतळाहून मुंबईकडे प्रयाण होईल.

Web Title: President Draupadi Murmu will be in Nagpur for two days and will also attend the convocation ceremony of Nagpur University.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.