वर्धा हिंदी विद्यापीठातील राष्ट्रपतींचा दौरा रद्द का? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 11:10 AM2023-06-29T11:10:07+5:302023-06-29T11:11:16+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ४ ते ६ जुलै दरम्यान नागपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
नागपूर / वर्धा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दि. ४ ते ६ जुलै दरम्यान तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मात्र आता त्यांच्या कार्यक्रमात वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचा समावेश नाही. यापूर्वीच्या निर्धारित कार्यक्रमात समावेश होता. आता राष्ट्रपतींचे हिंदी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला येणे रद्द का झाले? असा प्रश्न चर्चेत आला आहे.
याबाबत कुणी स्पष्टीकरण देण्यास तयार नाही. विद्यापीठाने दीक्षांत समारंभ रद्द झाल्याचे कळविले, मात्र त्यात कोणतेही स्पष्ट कारण नमूद केले नाही. शिक्षण क्षेत्रात मात्र पूर्वीच शंका व्यक्त केली जात होती की ऐनवेळी का होईना; पण हिंदी विद्यापीठाचा राष्ट्रपतींचा दौरा रद्द होऊ शकतो. या चर्चेचे कारण एक मोठा व अचानक समोर आलेला वाद आहे. असे सांगितले जात आहे की, विद्यापीठातील एका मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात एका महिलेने अत्यंत गंभीर स्वरुपाची तक्रार पोलिसांना फोन करून केली. अशीही चर्चा आहे की, ज्या दिवशी तक्रार झाली त्याच दिवशी ताबडतोब समझोतादेखील झाला. प्रकरण शांत झाले असले तरी त्याची चर्चा सर्वत्र घडली. संघटनेपासून ते सत्तेपर्यंत ही बातमी पोहोचली. याच वादामुळे राष्ट्रपती भवनाने हिंदी विद्यापीठाच्या कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ४ ते ६ जुलै दरम्यान नागपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी बुधवारी तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला सहायक पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विद्या भवनचे राजेंद्र पुरोहित व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ, कोराडी येथे रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण ५ व ६ जुलै रोजी होणार आहे.