राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:50 AM2017-09-22T01:50:29+5:302017-09-22T01:50:46+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होत आहे. राष्ट्रपती एक दिवसाच्या व्यस्त कार्यक्रमात दीक्षाभूमी, रामटेक येथील श्री शांतिनाथ जैन मंदिराला भेट, ड्रॅगन पॅलेस येथील विपश्यना मेडिटेशन सेंटर तसेच सुरेश भट नाट्यगृहाचे लोकार्पण करणार आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद विमानतळावर स्वागताचा स्वीकार करून दीक्षाभूमीसाठी प्रयाण करतील. सकाळी १०.२५ ते १०.४५ वाजेपर्यंत ते दीक्षाभूमीला भेट देऊन दर्शन करतील. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर ते रामटेकसाठी प्रयाण करतील. रामटेक येथे सकाळी ११.५५ वाजता आगमन होईल. सकाळी ११.५५ ते दुपारी १२.१० वाजेपर्यंत श्री शांतिनाथ जैन मंदिराला भेट देतील. त्यानंतर ते रामटेक येथून दुपारी १२.१० वाजता कामठी येथील विपश्यना मेडिटेशन सेंटरसाठी प्रयाण करतील. दुपारी १२.५५ ते १.४० वाजेपर्यंत विपश्यना मेडिटेशन सेंटरचे लोकार्पण, विशेष बुद्ध वंदना तसेच विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या लोकार्पण समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील.
दुपारी १.४० वाजता येथून राजभवनकडे प्रयाण करतील. दुपारी २.१० वाजता राजभवन येथे त्यांचे आगमन होईल. तेथे दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ राखीव राहील.
नागपूर महानगर पालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या रेशीमबाग येथील सुरेश भट नाट्य सभागृहाचे उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रपती यांचे दुपारी ४.१५ वाजता आगमन होईल. दुपारी ४.१५ ते ५ वाजेपर्यंत सुरेश भट नाट्य सभागृहाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून विमानतळाकडे प्रयाण करतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपूर विमानतळ येथून सायंकाळी ५.२५ वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने दिल्लीसाठी प्रयाण होईल.
असा आहे दौरा
सकाळी १० वाजता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
सकाळी १०.२५ ते १०.४५ वाजता : दीक्षाभूमीला भेट
सकाळी ११.५५ ते १२.१० वाजता : श्री शांतिनाथ जैन मंदिराला भेट
दुपारी १२.५५ ते १.४० वाजता : कामठी येथील विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन
दुपारी १.४० वाजता : राजभवनाकडे प्रयाण
दुपारी २.१० वाजता : राजभवन येथे आगमन
दुपारी ४ वाजेपर्यंत : राखीव वेळ
सायंकाळी ४.१५ वाजता : नागपूर महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या सुरेश भट नाट्य सभागृहाचे उद्घाटन
सायंकाळी ५ वाजता : विमानतळाकडे प्रयाण
सायंकाळी ५.२५ वाजता : नागपूर विमानतळ येथून भारतीय हवाई दलाच्या विमानाने दिल्लीसाठी प्रयाण