राष्ट्रवादीने जिल्ह्यातही नेमले कार्याध्यक्ष
By admin | Published: October 3, 2015 03:26 AM2015-10-03T03:26:20+5:302015-10-03T03:26:20+5:30
राष्ट्रवादीने नागपूर शहरात कार्याध्यक्ष नेमताच आता जिल्हा ग्रामीण मध्येही कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत.
राजाभाऊ टांकसाळे यांची नियुक्ती : बंग यांनाही समान न्याय
नागपूर : राष्ट्रवादीने नागपूर शहरात कार्याध्यक्ष नेमताच आता जिल्हा ग्रामीण मध्येही कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजाभाऊ टांकसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे शहर व जिल्ह्यात माजी मंत्री अध्यक्ष तर त्यांचे विश्वासू कार्याध्यक्ष असे चित्र निर्माण झाले आहे.
टांकसाळे हे बंग यांचे निष्ठावान मानले जातात. पक्ष संघटनेत कामाचा दांडगा अनुभव आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार व व्यसनमुक्ती पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहर व जिल्ह्यात गटबाजी वाढली होती. यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रामबाण उपाय शोधून काढत माजी मंत्री अनिल देशमुख यांची शहर अध्यक्षपदी तर माजी मंत्री रमेश बंग यांची जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मंत्री राहिलेल्या नेत्यांना शहर व जिल्ह्याची जबाबदारी सोपविल्यामुळे हे एकप्रकारे डिमोशनच आहे, अशी चर्चा पक्षात रंगली होती. आपल्याकडील अध्यक्षपदाचा कार्यभार काढावा, अशी विनंती देशमुख यांनी पक्षाकडे केली होती. बंग शांत होते. देशमुखांना जो न्याय मिळेल तो आपल्याही मिळेल, हे त्यांना ठाऊक होते. नुकतेच झालेल्या राष्ट्रवादीच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात खा. प्रफुल पटेल यांनी दोन्ही अध्यक्षांना चिमटे काढत काही वेळ यांना काम करू द्या, अशी विनंती शरद पवार यांच्याकडे करून देशमुख व बंग यांची घुसमट वाढविली होती. मात्र, पवार यांनी त्याच कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांचा आवाका मोठा असल्यामुळे त्यांना शहर व जिल्ह्यात गुंतवून ठेवता येणार नाही, लवकरच मोठी जबाबदारीही पार पाडावी लागेल, असे सांगत दिलासाही दिला होता.
मेळाव्यानंतर दोनच दिवसांनी अनिल देशमुख यांनी नागपूर शहरासाठी प्रवीण कुंटे पाटील यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली व त्यांच्याकडे कार्यालयीन कामकाजही सोपविले. त्या वेळी ग्रामीणमध्ये बंग कार्याध्यक्ष नेमतील का, अशी चर्चा सुरू झाली होती. आता टांकसाळे यांच्या नियुक्तीमुळे बंग यांनाही पक्षाने समान न्याय दिला आहे. (प्रतिनिधी)
पक्षाने संघर्षाच्या काळात महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. येत्या जिल्हाध्यक्षांनी पक्षवाढीसाठी दिलेले कार्यक्रम जोमाने राबविले जातील. विविध क्षेत्रातील मान्यवरांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची मान उंचावली जाईल, असे काम करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- राजाभाऊ टांकसाळे
कार्याध्यक्ष, जिल्हा ग्रामीण