‘मनोहर’ साहित्यसंघटक निवर्तला, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे निधन

By प्रविण खापरे | Published: October 14, 2022 08:28 PM2022-10-14T20:28:08+5:302022-10-14T20:29:12+5:30

गेल्या १६ वर्षापासून ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी आपल्या वयाची अर्ध्याहून अधिक वर्षे विदर्भ साहित्य संघाच्या सेवेत घालवली आहेत.

President of Vidarbha Sahitya Sangh Manohar Mhaisalkar passed away | ‘मनोहर’ साहित्यसंघटक निवर्तला, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे निधन

‘मनोहर’ साहित्यसंघटक निवर्तला, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे निधन

googlenewsNext

नागपूर: कुशल साहित्यसंघटक म्हणून सर्वपरिचित असलेले विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, बहिण, भाऊ, नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. 

गेल्या १६ वर्षापासून ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी आपल्या वयाची अर्ध्याहून अधिक वर्षे विदर्भ साहित्य संघाच्या सेवेत घालवली आहेत. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या स्वभावाने ते अनेकांची मने जिंकून घेत असत. त्याचमुळे, त्यांच्या निधनाने साहित्यसंघटन क्षेत्रातील ‘मनोहर’ व्यक्तिमत्त्व हरवल्याची शोककळा साहित्य वर्तुळात पसरली आहे.

मनोहर म्हैसाळकर हे दीर्घकाळापासून मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. याच आजारामुळे त्यांना गुरुवारी १३ ऑक्टोबराला एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. याच रुग्णालयात त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता अखेरचा श्वास घेतला.  प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा १५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर २००६ साली त्यांनी विदर्भ साहित्य संघाची धुरा आपल्या हाती घेतली. तेव्हापासून ते आजतागायत मनोहर म्हैसाळकर आणि विदर्भ साहित्य संघ एकमेकांना पर्याय झाले होते. मनोहर म्हैसाळकरांचे कार्य केवळ विदर्भ साहित्य संघापुरतेच मर्यादित नव्हते तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाशी संलग्नित बृहन्महाराष्ट्रातील सर्व संस्थांमध्ये त्यांचा पगडा होता. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन असो वा साहित्य संमेलनाचे अध्यक्षांची निवड असो, त्यांची भूमिका कायम निर्णायक ठरली आहे. त्यांचा हा दराराच विदर्भ साहित्य संघाला अग्रणी स्थान प्राप्त करवून देणारा ठरला आहे. त्यांच्या कार्याचा आवाका आणि साहित्यसंघटन कौशल्य बघूनच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांचा २०२१-२२चा ‘प्राचार्य राम शेवाळकर’ पुरस्कार देऊन गौरव केला होता. २००० साली अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेने त्यांना पहिल्या भाऊसाहेब स्मृती ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित केले होते. १९९९ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेने त्यांना मराठी साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट व ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्काराने गौरवान्वित केले होते. २००६ साली त्यांना मानव मंदिर नागपूर या संस्थेने प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय, त्यांना विविध संस्था, संघटनांकडून सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विदर्भासह महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात शोककळा पसरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर संदेश लिहीत आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.

Web Title: President of Vidarbha Sahitya Sangh Manohar Mhaisalkar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर