राष्ट्रपतींचे कौतुकोद्गार म्हणाले, ‘ग्रेट... धिस इज फॅब्युलस कॅम्पस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 02:21 PM2022-05-09T14:21:28+5:302022-05-09T14:31:33+5:30
‘प्रोटोकॉल’अंतर्गत राष्ट्रपती कार्यालयाकडे ‘आयआयएम’ची संपूर्ण माहिती अगोदरच पाठविण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष ‘कॅम्पस’मध्ये आल्यानंतर त्यांनी स्वत: अनेक बाबी जाणून घेतल्या.
योगेश पांडे
नागपूर : ‘आयआयएम-नागपूर’च्या ‘मिहान’ येथील नवीन ‘कॅम्पस’चे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झालेले उद्घाटन ऐतिहासिक ठरले. मे महिन्यात तळपत्या उन्हात आगमन झाल्यावर राष्ट्रपती थेट कार्यक्रमाच्या मंचावर येतील, अशी अपेक्षा होती. मात्र राष्ट्रपतींनी गरमीची पर्वा न करता ‘आयआयएम’च्या संपूर्ण परिसराची पाहणी तर केलीच. शिवाय अनेक लहान लहान बाबीदेखील जाणून घेतल्या. विशेष म्हणजे पूर्ण पाहणी केल्यावर त्यांच्या तोंडातून सहजपणे कौतुकोद्गार निघाले, ‘ग्रेट...धिस इज फॅब्युलस कॅम्पस’. जागतिक पातळीवरील शिक्षण देणाऱ्या ‘आयआयएम’च्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रपतींची अभ्यासूवृत्ती अनुभवता आली.
कार्यक्रमस्थळी आगमन झाले तेव्हा पारा ४३ अंशांच्या जवळपास होता. कडेकोट बंदोबस्त असल्याने तेथे केवळ मोजक्या मान्यवरांची उपस्थिती होती. प्रवेशद्वारावर आगमन झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले अन् त्यानंतर उपस्थित पदाधिकारी, नेत्यांना राष्ट्रपतींचा अभ्यास अनुभवायला मिळाला. ‘प्रोटोकॉल’अंतर्गत राष्ट्रपती कार्यालयाकडे ‘आयआयएम’ची संपूर्ण माहिती अगोदरच पाठविण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष ‘कॅम्पस’मध्ये आल्यानंतर त्यांनी स्वत: अनेक बाबी जाणून घेतल्या.
राष्ट्रपती कोविंद यांनी ‘आयआयएम‘चे संचालक डॉ. भीमराया मेत्री तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ‘आयआयएम’च्या ‘मॉडेल’ची पूर्ण माहिती घेतली. शिवाय पहिल्या फेजमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी झाल्या आहेत, त्याचा विद्यार्थी व शिक्षकांना कसा फायदा होईल, ‘कॅम्पस’ कशा पद्धतीने ‘इकोफ्रेंडली’ आहे हे जाणून घेतले. केवळ इतकेच नव्हे तर दुसऱ्या टप्प्यात काय कामे होणार आहेत व भविष्यात आणखी काय योजना आहेत याचीदेखील संपूर्ण माहिती घेतली. ‘कॅम्पस’ची भव्यता, आकर्षकता व कामाच्या दर्जावर त्यांनी आनंद व्यक्त केला, असे डॉ. मेत्री यांनी सांगितले.
१० मिनिटे पायीच पाहणी
राष्ट्रपतींनी सुमारे १५ मिनिटे संपूर्ण ‘कॅम्पस’ची पाहणी केली व त्यानंतर ते मंचावर आले. राष्ट्रपतींच्या सुविधेसाठी ‘ई-वेहिकल’ची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु त्यांनी १० मिनिटे पायीच पाहणी केली. ‘ई-वेहिकल’मधून जात असताना त्यांनी प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी यांच्याकडून ‘कॅम्पस’ कसा ‘इकोफ्रेंडली’ आहे हे जाणून घेतले.