राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ‘आयआयएम-नागपूर’च्या नव्या ‘कॅम्पस’चे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 04:01 PM2022-04-07T16:01:15+5:302022-04-07T17:45:16+5:30

या ‘कॅम्पस’च्या पहिल्या टप्प्यात साठ हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर बांधकाम करण्यात आले असून, जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

President Ramnath Kovind to inaugurate the new campus of IIM-Nagpur | राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ‘आयआयएम-नागपूर’च्या नव्या ‘कॅम्पस’चे उद्घाटन

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ‘आयआयएम-नागपूर’च्या नव्या ‘कॅम्पस’चे उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देपहिला टप्पा पूर्ण साठ हजार चौरस मीटरवर बांधकाम; अत्याधुनिक सोयी-सुविधा

नागपूर : ‘आयआयएम-नागपूर’ आता लवकरच कायमस्वरूपी ‘कॅम्पस’मध्ये स्थानांतरित होणार आहे. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात या बहुप्रतिक्षित ‘कॅम्पस’चे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी उपस्थित राहण्यासाठी होकार दिला आहे. या ‘कॅम्पस’च्या पहिल्या टप्प्यात साठ हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर बांधकाम करण्यात आले असून, जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आयआयएम-नागपूर’चे वर्ग २०१५ मध्ये प्रत्यक्षात सुरू झाले. देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे संस्थेचे पालकत्व देण्यात आले. त्यानंतर ‘आयआयएम-नागपूर’मधून सातवी ‘बॅच’ बाहेरदेखील पडण्याच्या तयारीत आहे; मात्र तरीदेखील कायमस्वरूपी ‘कॅम्पस’ची प्रतीक्षा कायम होती. कायमस्वरूपी इमारतीसाठी मिहानमधील मौजा दहेगाव येथील २०० एकर जागा प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी १४३ जागा राज्य शासनाने दिली. ६ मार्च २०१९ रोजी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले.

साधारणत: १८ ते २० महिन्यांत बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते; परंतु कोरोनामुळे कामाला फटका बसला. निर्बंध शिथिल झाल्यानंतर कामाला परत वेगाने सुरुवात झाली व आता अत्याधुनिक ‘कॅम्पस’चा पहिल्या टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. ‘कॅम्पस’च्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना निमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू होते. यासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आले व राष्ट्रपती कार्यालयाकडून होकार देण्यात आला.

उद्घाटनाची नेमकी तारीख अद्याप गुप्त ठेवण्यात आली असली तरी २३ ते ३० एप्रिलदरम्यान हे आयोजन होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात ‘आयआयएम’चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सहाशे विद्यार्थ्यांची क्षमता

पहिल्या टप्प्यात १३२ एकरवर ‘कॅम्पस’ विकसित करण्यात आला आहे. यासाठी २०१८ मध्ये केंद्र शासनाने ३७९ कोटी ६९ लाख रुपये मंजूर केले होते. पहिल्या टप्प्यातील बांधकाम हे सहाशे विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात घेऊन करण्यात आले आहे. एकूण ६० हजार चौरस मीटरवर बांधकाम करण्यात आले आहे.

जागतिक दर्जाच्या वर्गखोल्या, आकर्षक ‘लँडस्केपिंग’

‘आयआयएम-नागपूर’च्या नवीन ‘कॅम्पस’मध्ये प्रशस्त वर्गखोल्या बांधण्यात आल्या असून, त्यात जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. सोबतच विद्यार्थ्यांचे वसतिगृह व डायनिंग हॉलदेखील प्रशस्त आहेत. विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ‘ओपन एअर ऑडिटोरिअम’ बांधण्यात आले असून, संपूर्ण ‘कॅम्पस’मध्ये आकर्षक ‘लँडस्केपिंग’वर भर देण्यात आला आहे.

या सुविधांचा समावेश

- आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘कॉम्प्लेक्स’, - प्रशस्त वाचनालय, प्रशासकीय इमारत

विद्यार्थी वसतिगृह, डायनिंग हॉल, क्रीडा संकुल, शिक्षकांची घरे

‘ईईपी’साठी (एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन प्रोग्राम) व्यवस्थापन विकास केंद्र

‘एन्ट्रप्रेनरशिप इन्क्युबेशन सेंटर’

ओपन एअर ऑडिटोरियम

Web Title: President Ramnath Kovind to inaugurate the new campus of IIM-Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.