दीक्षाभूमी संपूर्ण विश्वाला त्याग, शांती व मानवतेची प्रेरणा देते - रामनाथ कोविंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 10:59 AM2017-09-22T10:59:47+5:302017-09-22T14:38:54+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपुरात आगमन झाले आहे. नागपुरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रपतींनी दीक्षाभूमीला भेट दिली व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शनही घेतले.
नागपूर, दि. 22- राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नागपूच्या दौ-यावर आहेत. नागपुरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रपतींनी दीक्षाभूमीला भेट दिली व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शनही घेतले. ‘परमपूज्यनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि समाजक्रांतीचा पाया या भूमीवर रचला. ज्यामुळे भारतीय तसेच संपूर्ण मानव समाज प्रगतीच्या मार्गात अग्रेसर होऊ शकला, ही पवित्र दीक्षाभूमी संपूर्ण विश्वाला त्याग, शांती व मानवता याकडे जाण्यास प्रेरणा देते. मला येथे येऊन अपार प्रसन्नता होत आहे', असे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिप्राय पुस्तिकेवर लिहिले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रपती झाल्यावर ते पहिल्यांदाच दीक्षाभूमीला आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जून सुरई ससाई, सचिव सदानंद फुलझेले आदी उपस्थित होते.
सकाळी 10.25 वाजता त्यांचा ताफा दीक्षाभूमीवर पोहोचला. स्तुपाच्या आत जाऊन तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रपती त्याच ठिकाणी पाच मिनिटे ध्यानस्थ बसले. यावेळी डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने त्यांना स्मृतीचिन्ह व ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा बौद्ध धम्मग्रंथ दिला. यावेळी त्यांनी दीक्षाभूमीच्या परिसराचे अवलोकन केले.
असा आहे दौरा
सकाळी १० वाजता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
सकाळी १०.२५ ते १०.४५ वाजता : दीक्षाभूमीला भेट
सकाळी ११.५५ ते १२.१० वाजता : श्री शांतिनाथ जैन मंदिराला भेट
दुपारी १२.५५ ते १.४० वाजता : कामठी येथील विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन
दुपारी १.४० वाजता : राजभवनाकडे प्रयाण
दुपारी २.१० वाजता : राजभवन येथे आगमन
दुपारी ४ वाजेपर्यंत : राखीव वेळ
सायंकाळी ४.१५ वाजता : नागपूर महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या सुरेश भट नाट्य सभागृहाचे उद्घाटन
सायंकाळी ५ वाजता : विमानतळाकडे प्रयाण
सायंकाळी ५.२५ वाजता : नागपूर विमानतळ येथून भारतीय हवाई दलाच्या विमानाने दिल्लीसाठी प्रयाण