एकाच विद्यार्थ्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार
By admin | Published: September 14, 2015 03:15 AM2015-09-14T03:15:33+5:302015-09-14T03:15:33+5:30
१५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नागपूर : १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘बी.टेक.चा विद्यार्थी प्रेम रमेश औटी हा सर विश्वेश्वरय्या पदकाचा मानकरी ठरला असून, केवळ त्याचाच राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होणार आहे.
‘व्हीएनआयटी’च्या १३ व्या दीक्षांत समारंभाबाबत संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यंदा परंपरेला फाटा देत केवळ ३६ गुणवंतांचा विविध पारितोषिकांनी मंचावर सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ.चौधरी यांनी दिली. निवडक लोकांनाच सभागृहाच्या आत प्रवेश राहणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘पास’ तयार करण्यात आले आहे. सभागृहाच्या आत छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आली असून, कॅमेरा तसेच मोबाईल आणण्यासदेखील बंदी आहे. १४ सप्टेंबर रोजी व्हीएनआयटी सभागृहात दीक्षांत समारंभाची रंगीत तालीम घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना यासाठी बोलविण्यात आले आहे. व्हीएनआयटीच्या संकेतस्थळावर या समारंभाचे ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार असून, यामुळे सहजपणे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
११४० विद्यार्थ्यांना मिळणार पदवी
दीक्षांत समारंभात एकूण ११४० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यात पीएचडीचे ४८, एमटेकचे ३१२, एमएस्सीच्या ४५ तर बीटेक व बीआर्कच्या ७२९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यंदा ‘एक्सेव्हेशन इंजिनिअरिंग’मधील ’एमटेक’ पदवीदेखील देण्यात येणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून अव्वल आलेली पूजा भोपळे व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम आलेला स्वप्नील पिंपळकर यांचादेखील सन्मान होणार आहे. कार्यक्रमाला ९५० विद्यार्थी उपस्थित राहतील व आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात जास्त उपस्थिती असेल, हे विशेष.