राष्ट्रपतिपदी हवी गैरराजकारणी व्यक्ती
By admin | Published: June 16, 2017 02:05 AM2017-06-16T02:05:10+5:302017-06-16T02:05:10+5:30
भारतीय प्रजासत्ताकाच्या १५ व्या राष्ट्रपतिपदी कोण येणार, यासंदर्भात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा रंगू लागल्या आहेत.
संघ वर्तुळातून अपेक्षा : उमेदवार सर्वमान्य व कलामांप्रमाणे समर्पित असावा
योगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय प्रजासत्ताकाच्या १५ व्या राष्ट्रपतिपदी कोण येणार, यासंदर्भात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय पक्षांनीदेखील यासंदर्भात आपापले धोरण निश्चित करण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र यासंदर्भात मौन राखले आहे. संघश्रेष्ठींना अंतिम नावाची कल्पना असली तरी संघ वर्तुळात विविध कयास लावले जात आहेत. मात्र राष्ट्रपतिपदी गैरराजकारणी व देशभरात जिच्याकडे आदरयुक्त नजरेने पाहिले जाते, अशी व्यक्तीच विराजमान व्हावी, असा संघ परिवारातून सूर येत आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांची अधिसूचना शनिवारी जारी होणार असून, गरज पडली तर १७ जुलै रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रपतींच्या नावाला एकमताने मान्यता मिळावी, असे रालोआतर्फे प्रयत्न सुरू आहेत तर काँग्रेससह विरोधकांनी एकत्र येत मोट बांधली आहे.
राष्ट्रपतिपदी रालोआचे उमेदवार म्हणून अनेक संभावितांची नावे आतापर्यंत समोर आली आहेत. यात लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाशसिंह बादल, झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू, उद्योगपती रतन टाटा, इतकेच काय तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाचीदेखील चर्चा ‘सोशल मीडिया’वर रंगली आहे.
संघ वर्तुळात बहुतांश स्वयंसेवकांची मात्र अपेक्षा वेगळीच आहे. राजकीय व्यक्ती राष्ट्रपतिपदी आली की त्यासोबत विविध वाददेखील येण्याची शक्यता असते. त्यामुळे या पदावर निष्कलंक, समाजासाठी झटणारा व सर्वमान्य प्रतिमा असणारी व्यक्तीच हवी. रालोआने असा गैरराजकीय उमेदवार दिला पाहिजे. महिला उमेदवार असली तरी विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जर राजकीय समीकरणे लक्षात घेता राजकीय उमेदवार द्यावाच लागला तर संबंधित व्यक्ती प्रामाणिक, वादापासून दूर असणारी व समाजात आपल्या कार्याने आदर प्राप्त केलेली हवी, अशी संघाच्या राष्ट्रीय पातळीवर सदस्यांचीदेखील भावना आहे.
सर्वांना घेऊन चालणारी व्यक्ती हवी!
याअगोदर रालोआच्या कार्यकाळात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे राष्ट्रपती झाले होते. कलाम यांचे कार्य, चारित्र्य आणि व्हिजन हे अतुलनीय होते. त्यामुळेच एरवी हिंदुत्वाची कास धरणाऱ्या संघानेदेखील त्यांच्या नावाला हिरवी झेंडी दिली होती. राष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीत संघाची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार हे जगजाहीर आहे. राष्ट्रपतिपदाचा रालोआचा उमेदवार कोण असेल हे संबंधित पक्ष ठरवतीलच. संघाचा तो विषय नाही. मात्र या पदावर प्रामाणिक, सर्वमान्य व पात्र व्यक्ती हवी ही अपेक्षा आहे. डॉ.कलाम यांच्या रूपाने देशाला एक ‘व्हिजनरी’ राष्ट्रपती लाभले होते. डॉ.कलाम महानच होते व त्यांच्यासारखीच समर्पित व्यक्ती राष्ट्रपतिपदी विराजमान झाली तर देशाचा गौरव आणखी वाढेल, असे मत संघाच्या अखिल भारतीय पातळीवरील एका पदाधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केले. यासंदर्भात संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.