राज्यातील ६७ पोलिसांना राष्ट्रपती पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:11 AM2021-08-15T04:11:04+5:302021-08-15T04:11:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - प्रतिकूल परिस्थितीत जीवाची बाजी लावून प्रशंसनीय सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती शाैर्यपदकांसह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - प्रतिकूल परिस्थितीत जीवाची बाजी लावून प्रशंसनीय सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती शाैर्यपदकांसह विविध पदकांची घोषणा झाली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शाैर्य पदक, ३ जणांना उल्लेखनीय सेवा पदक आणि ३९ जणांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी या सर्वांना हे पदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, जाहीर झालेल्या २५ राष्ट्रपतींचे पोलीस शाैर्य पदकांपैकी (पीएमजी) सर्वाधिक १८ पदके गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पटकाविली आहेत. अमरावतीचे पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन आणि नागपूरचे निवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परमानंद तिवारी यांनाही हे मानाचे पदक जाहीर झाले आहे. गोंदियातील हवालदार विनायक विठ्ठलराव अतकर तसेच ओमप्रकाश मनोहर जामनिक यांनाही या पदकाने पुरस्कृत करण्यात आले आहे.
राज्यातील तिघांना उल्लेखनीय सेवा पदक (पीपीएम) घोषित झाले. गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे, नाशिक ग्रामीणचे पीएसआय अशोक उत्तम अहिरे आणि यवतमाळचे पोलीस उपनिरीक्षक (महामार्ग पोलीस) विनोदकुमार लालताप्रसाद तिवारी यांना हा सन्मान मिळाला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील ३९ जणांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक (पीएम) घोषित झाले आहे. त्यात नागपूरला एसआरपीएफचे सहायक समादेशक असलेले ललित रामकुमार मिश्रा, सुभाष श्रीपत बुरडे (सहायक पोलीस उपनिरीक्षक, नागपूर ग्रामीण), राजेंद्र राऊत (अमरावती, पोलीस निरीक्षक, एसआरपीएफ) तसेच प्रमोदकुमार प्रतापरंजन बाला (हवालदार, चंद्रपूर) यांचा समावेश आहे.
----