राष्ट्रपतींचा नागपूर दौरा पुढे ढकलला; ८ मे रोजी होणार ‘आयआयएम’च्या नव्या इमारतीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 07:59 PM2022-04-21T19:59:28+5:302022-04-21T20:00:43+5:30
Nagpur News देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा २३ एप्रिल रोजीचा नियोजित नागपूर दौरा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला आहे.
नागपूर : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा २३ एप्रिल रोजीचा नियोजित नागपूर दौरा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यांच्या हस्ते ‘आयआयएम-नागपूर’च्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार होते; परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. या संदर्भात राष्ट्रपती भवनातून तातडीने पत्रव्यवहारदेखील करण्यात आला असून, आता ८ मे रोजीची वेळ देण्यात आली आहे.
‘आयएमएम-नागपूर’चे चेअरमन सी. पी. गुरनानी, संचालक डॉ. भीमराया मेत्री व मुख्य प्रशासकीय अधिकारी मकरंद अलुर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून तात्पुरत्या इमारतीत सुरू असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’च्या कायमस्वरूपी इमारतीचे २३ एप्रिल रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार होते. त्या दृष्टीने प्रशासन तसेच सुरक्षायंत्रणांची तयारीदेखील सुरू झाली होती. ‘आयआयएम-नागपूर’ने निमंत्रण पत्रिकादेखील प्रकाशित केल्या व त्यांचे वितरणदेखील झाले. मात्र गुरुवारी राष्ट्रपतींचे खासगी सचिव पी. प्रवीण सिद्धार्थ यांनी पत्राद्वारे २३ तारखेचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे कळविले. राष्ट्रपतींना त्याच दिवशी दिल्लीतदेखील कार्यक्रम असून काही अपरिहार्य कारणांमुळे त्या दिवशी त्यांना नागपुरात उपस्थित राहणे शक्य नाही. ८ मे रोजी त्यांचा दौरा नियोजित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘आयआयएम-नागपूर’च्या प्रशासनाने तत्काळ या तारखेसाठी होकार दिला. ८ मे रोजी इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होईल.
राज्यपाल, मुख्यमंत्री, गडकरी येणार
राष्ट्रपतींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित राहतील, अशी माहिती सी. पी. गुरनानी यांनी दिली.
‘आयआयएम-नागपूर’ विसरले खासदारांचा प्रोटोकॉल
पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी ‘आयआयएम-नागपूर’ने प्रकाशित केलेल्या निमंत्रण पत्रिकेत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचे नावच नसल्याची बाब समोर आली. राष्ट्रपती येणार असल्याने खासदारांना मंचावर स्थान देणे हा राजशिष्टाचार असतो. ‘आयआयएम-नागपूर’ हे रामटेक लोकसभा क्षेत्रात येते. मतदारसंघात आलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे कार्यक्रमस्थळी स्वागत करण्याचा स्वाधिकार त्या क्षेत्रातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा असतो, संविधानाने व संसदेने त्यांना हा अधिकार दिला आहे. मात्र, ‘आयआयएम’सारख्या व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांकडूनच जबाबदारीत दिरंगाई व प्रोटोकॉल पाळला जात नसेल, तर यापेक्षा दुखद काहीच नाही. या प्रकारामुळे प्रोटोकॉल व खासदार म्हणून माझ्या अधिकारांचे हनन झाले असल्याचे मत तुमाने यांनी व्यक्त केले.