राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली

By admin | Published: September 15, 2015 05:52 AM2015-09-15T05:52:30+5:302015-09-15T05:52:30+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी वैमानिकाच्या समयसूचकतेने राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना

The president's plane crash was avoided | राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली

राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली

Next

वसीम कुरैशी ल्ल नागपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी वैमानिकाच्या समयसूचकतेने राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली. वैमानिकाने या घटनेची तक्रार हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि वायूसेनेकडे केली आहे. सोमवारी सायंकाळी ५.४२ च्या सुमारास राष्ट्रपतींचे विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानासमोर आठ डुक्कर आले. पण वैमानिकाने आपल्या उत्तम कार्यक्षमतेचा परिचय देत दुर्घटना टाळली.
मनपाच्या शतकोत्तर समारंभात उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वायूसेनेच्या विमानाने सोमवारी नागपुरात दाखल झाले. अतिविशेष व्यक्तीच्या विमानासाठी धावपट्टीवर सक्षम सुरक्षा नसल्याचे पाहून वैमानिक नाराज झाल्याची माहिती आहे. या विमानाच्या सुरक्षेची सर्वस्वी जबाबदारी वैमानिकावर असते. विमानतळावर डुकरांची हजेरी विमानासाठी धोक्याची घंटा होती.

धावपट्टीवर डुक्कर आले कसे?
हा एक गंभीर मुद्दा आहे. यापूर्वी लोकमतने धावपट्टीवर प्राण्यांचा वावर असल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा भिंत तुटली असून काही जागी उंची फारच कमी आहे. याशिवाय आतील भागात दाट झाडे आहेत. यामुळेच काही महिन्यांआधी एकजण भिंत ओलांडून धावपट्टीजवळ आला होता.
विमानासाठी डुक्कर धोकादायक
या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठे डुक्कर विमानासाठी धोकादायक ठरू शकतात. राष्ट्रपतींच्या हवाई यात्रेसाठी बोर्इंग-७३७ विमानाचा उपयोग करण्यात आला. विमान सुरू असताना जवळील प्राणी टर्बाईन अथवा इंजिन ओढते. त्यामुळे इंजिन नादुरुस्त होऊन आग लागण्याची जास्त शक्यता असते. आजच्या घटनेत डुक्कर विमानाच्या समोरील चाकात आले असते तर विमान दुर्घटनाग्रस्त झाले असते.
‘एमआयएल’वर होऊ शकते कारवाई
वर्ष २००८ पासून विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नव्हत्या. धावपट्टीच्या कडेला पक्ष्यांना हटविण्यासाठी जोल गन बसविली आहे. याशिवाय प्राण्यांना धावपट्टीवर येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी सोलर फेन्सिंग लावली आहे. त्यानंतरही डुक्कर धावपट्टीवर आले. राष्ट्रपतींचा वैमानिक वायूसेनेचा अधिकारी असतो. त्याने केलेली तक्रार हे गंभीर प्रकरण आहे. तक्रारीच्या आधारे मिहान इंडियावर कारवाईची दाट शक्यता आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे कंपनीला द्यावी लागणार आहेत.
खा. दर्डा यांनी वारंवार वेधले लक्ष
अशा प्रकारच्या घटना नागपूर विमानतळावर यापूर्वीही घडलेल्या आहेत. खा. विजय दर्डा यांनी संसदेत तसेच संसदेच्या नागरी हवाई वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये नागपूर विमानतळावरील सुरक्षाविषयक मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता. देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या आगमनाप्रसंगी जर अशी घटना घडत असेल तर सामान्य प्रवाशांच्या बाबतीत विमानतळ प्रशासन किती दक्ष आहे, हे यावरून दिसून येते.

Web Title: The president's plane crash was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.