नागपूर जि.प.च्या सक्रिय सदस्यांचा जादा निधीसाठी दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 09:09 PM2020-09-26T21:09:58+5:302020-09-26T21:11:07+5:30
जिल्हा परिषदेतील काही सक्रिय सदस्यांची डोकेदुखी अधिकाऱ्यांना सहन करावी लागत आहे. कुठल्याही कामासाठी आलेला जास्तीत जास्त निधी आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी हे सदस्य अधिकाऱ्यांवर दबाव वाढवीत आहेत. विशेष म्हणजे निधी वाटपाचे काही नियम आहेत, पण काही सदस्य नियमबाह्यरीत्या जादा निधीची मागणी करीत असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेतील काही सक्रिय सदस्यांची डोकेदुखी अधिकाऱ्यांना सहन करावी लागत आहे. कुठल्याही कामासाठी आलेला जास्तीत जास्त निधी आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी हे सदस्य अधिकाऱ्यांवर दबाव वाढवीत आहेत. विशेष म्हणजे निधी वाटपाचे काही नियम आहेत, पण काही सदस्य नियमबाह्यरीत्या जादा निधीची मागणी करीत असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेमध्ये काही सदस्य अतिशय सक्रिय आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक घडामोडीत ते सहभागी असतात. अधिकारी, पदाधिकाऱ्यांना भेटणे, त्यांच्याक डून कामे रेटून काढण्यात या सदस्यांचा हातखंडा आहे. यातीलच काही सदस्य अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. एकीकडे कोरोनामुळे शासनाकडून अर्थसंकल्पाला कात्री लावण्यात आल्याने जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीवर परिणाम झाला आहे. त्यातच मुद्रांक शुल्कातून मिळणारा निधीही कमी होणार आहे. जिल्हा परिषदने यंदा ३४ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनामुळे शासनाने मुद्रांक शुल्कात कपात करताना जिल्हा परिषदेच्या नावे आकारण्यात येणारा सेस कमी केला. त्याचा सात ते आठ कोटींचा फटका बसणार आहे. परिणामी सर्वच विभागाच्या निधीत कपात होणार आहे. जिल्हा परिषदकडे निधीची कमरता असल्याने असलेल्या जास्तीत जास्त निधी आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये लागली आहे. यासाठी त्यांच्याकडून दबावतंत्राचा वापर होत आहे. काहींकडून विविध प्रकारचे आरोप करीत तक्रार करण्याचा इशारा देण्यात येत असल्याची चर्चा आहे. काही सदस्यांना जादा निधी दिल्यास इतर सदस्यांच्या निधीत कपात होणार आहे, त्याचे वेगळे दुखणे अधिकाऱ्यांना सहन करावे लागणार आहे. काहींकडून कंत्राट मिळण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचीही माहिती आहे.