इचमपल्ली धरणासाठी राज्यपालांवर दबाव!

By admin | Published: November 12, 2014 12:57 AM2014-11-12T00:57:34+5:302014-11-12T00:57:34+5:30

तेलंगण सरकारने इचमपल्ली धरणाच्या निर्मितीसाठी आक्रमक पाऊल उचलले असून, रविवारी हैदराबाद येथे आयोजित महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांना

Pressure on the governor for the Echampalli! | इचमपल्ली धरणासाठी राज्यपालांवर दबाव!

इचमपल्ली धरणासाठी राज्यपालांवर दबाव!

Next

तेलंगण भाजपा महाराष्ट्राच्या मुळावर
अभिनय खोपडे - गडचिरोली
तेलंगण सरकारने इचमपल्ली धरणाच्या निर्मितीसाठी आक्रमक पाऊल उचलले असून, रविवारी हैदराबाद येथे आयोजित महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांना इचमपल्ली धरणाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहकार्य करा, असे जाहीर आवाहनच करण्यात आले. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालांवर तेलंगण सरकारने या कामासाठी मोठा दबाव वाढविला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
महाराष्ट्र-तेलंगण सीमेलगत १९८० च्या दशकात इचमपल्ली धरणाचे काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता़ या धरणात सिरोंचा तालुक्यातील दीडशे गावे बुडीत क्षेत्रात जाणार आहेत. तत्कालीन वनमंत्री छेदीलाल गुप्ता यांनी सदर धरण झाल्यास आपण पहिले आंदोलन करू, असाही इशारा आंध्र प्रदेश सरकारला दिला होता.
महाराष्ट्राचा हा विरोध लक्षात घेऊन या धरणाचे काम ३० वर्षांपासून प्रलंबित आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी हस्तक्षेप करून हे काम थांबविले होते. इचमपल्ली धरणामुळे तेलंगणच्या १० जिल्ह्यांतील जवळपास दीड लाख एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. तसेच छत्तीसगडमध्ये वीज निर्मिती प्रकल्पालाही पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तेलंगण या धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तेलंगण सरकारतर्फे हैदराबाद येथे महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांचा ९ नोव्हेंबर रोजी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राव यांना इचमपल्ली धरणाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन केले. राज्यपाल राव हे तेलंगणच्या करिमनगर भागातील रहिवासी आहेत. ते भाजपाचे माजी खासदारही होते. ते इचमपल्ली धरणाचे समर्थक असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांनी सत्कारादरम्यान धरणाच्या कामासाठी सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात रविवारी बंडारू दत्तात्रेय यांचीही वर्णी लागली आहे. तेही या इचमपल्ली धरणाचे कट्टर समर्थक आहेत. याशिवाय तेलंगण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष क्रिष्णा रेड्डी यांनी २००३-०४ मध्ये सदर धरणाचे काम मार्गी लागावे म्हणून आंदोलन केले होते. त्यावेळी ते भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
तेलंगणमधील भाजपाची भूमिका ही इचमपल्ली धरणाच्या समर्थनाची आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रावर केंद्र सरकार व राज्यपाल राव यांच्या माध्यमातून दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने सद्यस्थितीत सुरू असलेल्या चव्हेला धरणाच्या कामालाही विरोध केलेला नाही. आता पुन्हा एका धरणाचे नवे संकट महाराष्ट्रावर येऊ घातले आहे.
दरम्यान, चंद्रपूर-गडचिरोली क्षेत्राचे माजी खासदार नरेश पुगलिया यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १९८० मध्ये आपण आमदार असताना या धरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या धरणामुळे सिरोंचा तालुक्याला मोठा फटका बसणार आहे. सुमारे दीडशेवर गाव बुडीत क्षेत्रात जातील. वनजमीनही बुडणार आहे. त्यामुळे या धरणाला विरोध करण्यात आला होता.

Web Title: Pressure on the governor for the Echampalli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.