‘विदर्भ प्रदेश काँग्रेस’च्या स्थापनेसाठी दबावगट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 04:24 AM2017-09-16T04:24:16+5:302017-09-16T04:24:51+5:30
विदर्भातील नाराज काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत एक दबावगट तयार करून हायकमांडकडे विदर्भ प्रदेश काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रदेश काँग्रेसमध्ये उघड दोन गट पडल्याचे चित्र समोर आले आहे.
नागपूर : विदर्भातील नाराज काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत एक दबावगट तयार करून हायकमांडकडे विदर्भ प्रदेश काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रदेश काँग्रेसमध्ये उघड दोन गट पडल्याचे चित्र समोर आले आहे.
विदर्भातील या नेत्यांची शुक्रवारी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या नागपुरातील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जन्मशताब्दी वर्ष विदर्भभर साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा शुभारंभ यवतमाळ येथून करण्यात येणार असून विदर्भातील कुठल्याही एका कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीत जाऊन निमंत्रण देण्याचाही निर्णय घेण्यात आला. सोबतच हे निमित्त साधत प्रदेश काँग्रेस व विलास मुत्तेमवार यांच्यावर नेम साधण्याचा मुख्य अजेंडा घेऊन रणनीती आखण्यात आल्याचे समजते.
या बैठकीत चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, डॉ. नितीन राऊत, अनीस अहमद, माजी आमदार अशोक धवड, प्रदेश सचिव नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नितीन कुंभलकर, कृष्ण कुमार पांडे, नरू जिचकार आदी उपस्थित होते.
या नेत्यांनी अहमद पटेल हे राज्यसभेवर विजयी झाल्यानंतर दिल्ली येथे जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश व प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत त्यांना हटविण्याची मागणी केली होती.