अवैध सावकारीला लागणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:57+5:302021-06-04T04:07:57+5:30

उमरेड : उमरेड व भिवापूर तालुक्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. उमरेड ...

Pressure on illegal lenders | अवैध सावकारीला लागणार चाप

अवैध सावकारीला लागणार चाप

Next

उमरेड : उमरेड व भिवापूर तालुक्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. उमरेड तालुक्यात ३१ मार्च २०२१ अखेर ७७ व भिवापूर तालुक्यात १५ असे एकूण ९२ परवानाधारक सावकार कार्यरत आहेत.

उमरेड-भिवापूर तालुक्यातील व्यक्तींना कर्ज घेण्याची आवश्यकता असल्यास त्यांना संबंधित कार्यक्षेत्रातील परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेता येईल. परवानाधारक सावकारांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी परवानाधारक सावकाराकडील व्याजाचे दर तारण कर्जासाठी दरसाल दरशेकडा (द.सा.द.शे) ९ टक्के तर विनातारण कजार्साठी १२ टक्के, असे दर आहेत. तर शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना दिलेल्या कर्जामध्ये तारण कर्ज १५ टक्के तर विनातारण कर्जासाठी व्याज द.सा.द.शे. १८ टक्के असे आहे.

तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीने अवैध सावकारी व्यवसाय करू नये. वैध परवान्याशिवाय सावकारी व्यवसाय करणे दखलपात्र गुन्हा असून, दोषी सिद्ध झाल्यावर पाच वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. उमरेड-भिवापूर तालुक्यातील नागरिकांनी अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीकडून कर्ज घेऊ नये. कुणी अवैध व्यवसाय सावकारीचा व्यवसाय करीत असेल किंवा त्या माध्यमातून एखाद्या नागरिकाची जमीन, घर, वाहन किंवा इतर कोणत्याही स्थावर अथवा जंगम मालमत्तेची विक्री, गहाण, भाडेपट्टा अन्य कोणत्याही रूपाने अवैध सावकाराच्या ताब्यात असल्यास अशा नागरिकांनी पुराव्यासह याबाबतची तक्रार सहायक निबंधक, सहकारी संस्था, उमरेड या कार्यालयात करावी. पुराव्यासह आलेल्या तक्रारीवर सहकारी अधिनियम २०१४ च्या अनुषंगाने कठोर कारवाई करण्यात येईल, असे सहायक निबंधक सहकारी संस्थेचे नितीन मस्के यांनी कळविले आहे.

Web Title: Pressure on illegal lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.