पाकविरोधात कारवाईसाठी संघाचा केंद्रावर दबाव
By admin | Published: September 21, 2016 05:28 AM2016-09-21T05:28:02+5:302016-09-21T06:45:22+5:30
जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली
योगेश पांडे,
नागपूर- जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आता ठोस पावले उचलावी, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील इतर संस्थांकडून केंद्रावर दबाव निर्माण करण्यात येत आहे.
या भ्याड हल्ल्यामागे असलेले दहशतवादी, त्यांचे ‘मास्टरमार्इंड्स’ आणि त्याना सहकार्य करणाऱ्यांविरोधात कारवाई अपेक्षित आहे, अशी भूमिका
संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकातून मांडली आहे. संघापाठोपाठच विश्व हिंदू परिषदेनेदेखील सविस्तर पत्रक जारी करुन केंद्र शासनाने पाकिस्तानसोबत कुठलीही चर्चा करण्यात येऊ नये, असा पवित्रा घेतला
आहे. जर पाकिस्तान आपल्याला जखमा देत असेल तर भारतातून पाकिस्तानकडे जे पाणी जाते ते अडविण्यात यावे.
तसेच पाकिस्तानसोबतचे सर्व व्यापार बंद करावे,
अशी मागणी विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली आहे.
>आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील कोंडी करा
पाकवर एकाच वेळी अनेक प्रकारच्या कारवाया केंद्राकडून झाल्या पाहिजेत. लष्कर जे करेल ते करेलच, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील पाकिस्तानची कोंडी होईल, या पद्धतीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर व्यक्त केले.
>पाकिस्तान समर्थक विचार मांडणाऱ्यांवर कारवाई हवी
अनेकदा पाकिस्तानचे समर्थन करणारे विचार सोशल मीडियातून मांडण्यात येतात. यासंदर्भात ठोस कारवाई करण्यासाठी केंद्राने राज्य शासनाला दिशानिर्देश द्यावेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे.