दादासाहेब कन्नमवारांचा पणतू असल्याची बतावणी, महाठग माडेवारकडून भाजपची दिशाभूल

By योगेश पांडे | Published: September 10, 2022 12:26 PM2022-09-10T12:26:58+5:302022-09-10T12:32:21+5:30

कन्नमवार कुटुंबीयांनी अगोदरच केले होते खंडन

pretending to be Dadasaheb Kannamwar great-grandson; BJP misled by conman Rohit Madewar | दादासाहेब कन्नमवारांचा पणतू असल्याची बतावणी, महाठग माडेवारकडून भाजपची दिशाभूल

दादासाहेब कन्नमवारांचा पणतू असल्याची बतावणी, महाठग माडेवारकडून भाजपची दिशाभूल

Next

नागपूर : एका जाहिरात कंपनीच्या मालकाला ४६ लाखांचा गंडा घालणाऱ्या व सध्या पोलिसांच्या कोठडीत असलेल्या ठकबाज रोहित माडेवारचे आणखी कारनामे समोर आले आहेत. माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचा पणतू असल्याची बतावणी करत समोरच्यावर प्रभाव पाडत माडेवारने राज्यभरात अनेकांची फसवणूक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचीदेखील त्याने हेच सांगत दिशाभूल केली होती व चक्क भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत त्याने ऑगस्ट २०२१ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दिनेश मारशेट्टीवार यांची ४६ लाखांनी फसवणूक करणाऱ्या माडेवारला बजाजनगर पोलिसांनी अटक केली. ही बाब समोर आल्यावर बजाजनगर पोलीस ठाण्यात त्याच्याकडून फसविल्या गेलेले आणखी लोक आले व त्यांनी आपबिती मांडली. तो भाजपचा पदाधिकारी असल्याचे सांगून त्याने अनेकांची फसवणूक केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता माडेवारने भाजप नेत्यांचीदेखील दिशाभूल केल्याची बाब समोर आली.

४६ लाखांचा गंडा घालणाऱ्या ठकबाज माडेवारला अटक; अनेकांना लावला चुना

ऑगस्ट २०२१ मध्ये त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्याने पदाधिकाऱ्यांना तो दादासाहेब कन्नमवार यांचा पणतू असल्याचेच सांगितले होते. पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत प्रसारमाध्यमांना तशाच आशयाचे पत्रकदेखील पाठविले होते. ८ ऑक्टोबर रोजी त्याची भाजपच्या भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्तीदेखील झाली होती. महाराष्ट्र प्रदेशाचे संयोजक नरेंद्र पवार यांनी याबाबत पत्रदेखील जारी केले होते.

कन्नमवारांच्या मुलाच्या पत्राकडेदेखील दुर्लक्ष

दादासाहेब कन्नमवारांचे नाव वापरून माडेवार भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत होता. या माध्यमातून त्याने अनेक मोठ्या नेत्यांच्या हस्ते स्वत:चा सत्कारदेखील करवून घेतला होता. २०२१ मध्ये ऑक्टोबर महिन्यात त्याची भाजपच्या भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र भाजपमध्ये त्याने प्रवेश घेतल्यानंतर लगेच दि. २६ ऑगस्ट रोजी कन्नमवारांचे पुत्र शरदराव यांनी पत्र जारी केले होते. माडेवारचा कन्नमवारांशी काहीही संबंध नाही. त्याची आई किंवा आजी यांचादेखील कन्नमवार कुटुंबाशी काहीही संबंध नव्हता. दादासाहेबांचा पणतू असल्याचा दावा करत तो लोकांची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ऑगस्ट महिन्यात पत्र जारी होऊनदेखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची काहीच दखल घेतली नव्हती.

अमरावती, ठाण्यातदेखील गंडा

आरोपी माडेवार याने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. छत्रपतीनगर येथील रहिवासी प्रदीप निळकंठराव केचे यांना शेती विकत घेऊन देण्याच्या नावावर चक्क ८ लाखाचा गंडा घातला. अमरावती अर्जुननगर येथील रहिवासी प्रवीणकुमार राऊत यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांना सुद्धा माडेवारने १ लाख ३१ हजाराचा गंडा घातल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात ठाणे जिल्ह्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याने आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची शक्यता असून, त्या दिशेने बजाजनगर पोलीस तपास करत आहेत.

Web Title: pretending to be Dadasaheb Kannamwar great-grandson; BJP misled by conman Rohit Madewar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.