म्हाडाच्या भूखंडांवरील अतिक्रमण रोखा
By admin | Published: June 22, 2015 02:57 AM2015-06-22T02:57:56+5:302015-06-22T02:57:56+5:30
म्हाडाच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश : रामगिरीत घेतला आढावा
नागपूर : म्हाडाच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.
रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हाडाच्या विविध वसाहतीतील समस्या व उपाययोजना सुचविण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. बैठकीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. प्रकाश गजभिये, म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, पोलीस आयुक्त एस.पी. यादव, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक संदीप जोशी, मुख्य अधिकारी प्रदीपकुमार डांगे प्रामुख्याने उपस्थित होते. भामटी-परसोडी येथील बहुमजली इमारतीतील गाळ्यांचे वैयक्तिक वारसा अभिहस्तांतरण करून देण्यासाठी म्हाडाच्या कायद्यात बदल करावा. येत्या विधिमंडळ अधिवेशनात प्रस्ताव आणावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीत भामटी-परसोडी, सोमलवाडा, डिव्हिजनल को-आॅपरेटिव्ह सोसायटी, रामबाग वसाहत, शिघ्रसिद्ध, गणकदर याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
पाणी बिलाच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता असलेल्या रामबाग, शांतिनगर, रिजरोड, राजे रघुजीनगर, बोरगाव, सोमवारी पेठ, नंदनवन या म्हाडा वसाहतीची समस्या १ डिसेंबर २०१५ पूर्वी सोडवावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
खापरी येथील म्हाडा वसाहतीमध्ये राहणाऱ्या गाळेधारकांचा प्रश्न सोडविण्यात यावा. कारण ही जागा मिहान प्रकल्पात गेल्यामुळे जवळच बहुमजली इमारत उभारून गाळे धारकांना द्यावे, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत केली. आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले यांनीही म्हाडासंदर्भात विविध सूचना केल्या. (प्रतिनिधी)