विदर्भ-तेलंगणा सीमेवर होणारी पशुधन तस्करी रोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 08:47 PM2018-05-23T20:47:12+5:302018-05-23T20:47:24+5:30
विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांना लागून असणाऱ्या तेलंगाणा राज्याच्या सीमेमधून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असून, ती तातडीने रोखण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलिसांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांना लागून असणाऱ्या तेलंगाणा राज्याच्या सीमेमधून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असून, ती तातडीने रोखण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलिसांना दिले.
यासंदर्भात नागपूर व अमरावती विभागाच्या पोलीस महानिरीक्षक व संबंधित विभागातील पोलीस अधीक्षकांची बैठक रविभवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना अहीर यांनी उपरोक्त माहिती दिली. या आढावा बैठकीदरम्यान गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम, नक्षलविरोधी अभियान विभागाचे पोलीस महानिरीक्षक शरद शेलार, सी.आर.पी.एफ. चे उप महानिरीक्षक शेखर, बी.एस.एन.एल. च्या मोबाईल नेटवर्किंग विभागाच्या महाव्यवस्थापिका नम्रता तिवारी, नागपूर सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, नागपूर ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे तसेच नागपूर परिमंडळातील पोलीस उपआयुक्त संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व आर्णीचे आमदार राजू तोडसाम उपस्थित होते.
अहीर यांनी सांगितले की, तेलंगणामध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच खान्देशमधून होणारी पशुधन तस्करी रोखण्यासाठी पोलीस विभागाला स्थानिक वाहतूक विभागाकडून मदत मिळावी, यासाठी आपण सूचना दिल्या आहेत. आढावा बैठकीमध्ये नागपूर-अमरावती विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, बी.एस.एन.एल.चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नक्षलगस्त भागात मोबाईल टॉवरची क्षमता वाढवा
गडचिरोली मधील नक्षलग्रस्त भागात मोबाईल नेटवर्कच्या क्षमता वाढीसाठी त्याचे ४ जी तंत्रज्ञानामध्ये अद्ययावतीकरण, टॉवर्सची उंची वाढवणे इत्यादी संदर्भात आपण बी.एस.एन.एल.च्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. गडचिरोलीच्या ज्या क्षेत्रामध्ये टॉवर्स लावण्यासाठी अडचणी येत होत्या त्यादेखील पोलीस यंत्रणेने दूर केल्या आहेत. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या पोलीस जवान, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यांना चांगली मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहितीही केंद्री गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी दिली.
एका गोळीचे उत्तर १०० गोळ्यांनी
पाकिस्तानकडून सतत सिसफायरचे उल्लंघन होत आहे. शिवाय आतंकवाद्यांच्या हल्ल्यामुळे काश्मीर धगधगत आहे. यावर बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर म्हणाले की, भारतीय जवानांकडून सडेतोड उत्तर दिले जात असून पाकिस्तानच्या एका गोळीचे उत्तर १०० गोळ्यांनी दिले जात असल्याचे सांगितले. शिवाय चीनवर बोलताना द्विपक्षीय संबंधात सुधारणा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.