हत्तीरोग दुरीकरणात सुशिक्षितांची आडकाठी; दुष्परिणामाची माहिती असतानाही उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:06 AM2019-01-29T10:06:59+5:302019-01-29T10:07:24+5:30

देशात नागपूरसह केवळ पाच जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात आहे. मात्र २० जानेवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेला सुशिक्षितांकडून आडकाठी येत आहे.

Prevention of elephantiasis; ignorance by citizens in Nagpur | हत्तीरोग दुरीकरणात सुशिक्षितांची आडकाठी; दुष्परिणामाची माहिती असतानाही उदासीनता

हत्तीरोग दुरीकरणात सुशिक्षितांची आडकाठी; दुष्परिणामाची माहिती असतानाही उदासीनता

googlenewsNext
ठळक मुद्दे२६ लाख लोकसंख्येत केवळ सात लाख लोकांनी खाल्ल्या गोळ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हत्तीरोगामुळे शारीरिक विकृती, आजन्म अपंगत्व असे गंभीर परिणाम होतात. रोग झाल्यावर कुठलेच औषध नाही. म्हणूनच राष्ट्रीयस्तरावर हत्तीरोग दुरीकरण मोहीम हाती घेण्यात आली. देशात नागपूरसह केवळ पाच जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात आहे. मात्र २० जानेवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेला सुशिक्षितांकडून आडकाठी येत आहे. औषधे घेऊन येणाऱ्यांनाच अपार्टमेंटच्या दारावर अडविले जात आहे. गोळ्या वाटप करणाºया कर्मचाºयांना सुशिक्षितांच्या वस्तीमध्ये कटु अनुभव येत आहेत. परिणामी, २६ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात नऊ दिवसांत केवळ सात लाख लोकांपर्यंतच कर्मचारी पोहचू शकले आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम ३१ तारखेला संपत आहे.
देशात हत्तीरोगाने ग्रस्त असलेले २५६ जिल्हे आहेत. यातील महाराष्ट्रात ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. एकट्या विदर्भात आठ जिल्हे आहेत. २०१७ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात हत्तीरोगाचे ६५ हजार रुग्ण आहेत. यात नागपूर जिल्ह्यात ४,७५८ व्यक्तींना अवयव सुजण्याचा तर २,८७७ व्यक्तींना गुप्तांगांना सुजण्याचा त्रास आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्वी ‘डायथिल कार्बामॅझिन सायट्रेट’ व ‘अलबेंडाझॉल’ औषध दिले जायचे. परंतु हत्तीपाय दुरीकरण मोहिमेत ‘आयव्हरमेक्टिन’ या औषधाचाही समावेश करण्यात आला आहे. या ‘ट्रिपल ड्रग’ मोहिमेचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यासह बिहारमधील अरवल जिल्हा, उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्हा, झारखंड येथील सिमडेगा जिल्हा व कर्नाटकमधील यादगीर जिल्ह्यामध्ये करण्यात आला. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ५१ लाख आहे. यातील ४८ लाख लोकांना ३१ जानेवारीपर्यंत हत्तीरोगाचे ‘ट्रिपल ड्रग’ देण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. यासाठी १३ हजार ९०० कर्मचाºयांची नेमणूक करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना आपल्यासमोर औषधे खाऊ घालण्याची ही एकच अट त्यांना देण्यात आली आहे. परंतु या मोहिमेची व्यापक जनजागृती झाली नसल्याने व या रोगाच्या गंभीरतेविषयी लोकांना माहिती नसल्याने अनेक अडचणींना येत असल्याचे वास्तव आहे.

पाठ फिरताच फेकल्या जात आहेत गोळ्या
कर्मचारी घराघरात जाऊन हत्तीरोगाची माहिती देत आहेत. रोगाला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधक गोळ्या आपल्या समक्ष खाण्याची विनंती करीत आहे. परंतु अनेक जण जेवण व्हायचे आहे असे सांगून कर्मचाऱ्यांकडून गोळ्या घेतात आणि त्यांची पाठ फिरताच फेकून देतात, हा अनुभव एका कर्मचाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर ‘लोकमत’ ला सांगितला.

कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नाही
शहरातील नागरिकांना गोळ्या खाऊ घालण्याची जबाबदारी मनपाचा आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, बचत गटातील महिला, सामाजिक कार्यकर्ते, नर्सिंग स्टाफ व समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे. यांची संख्या दोन हजारांच्या घरात आहे. परंतु यांच्याकडे ओळखपत्र नाही. यामुळे अनेक नागरिक त्यांच्यावर संशय व्यक्त करीत असल्यानेही मोहिमेत आडकाठी येत आहेत.

काय आहे, प्रतिबंधक उपचार
हत्तीरोगाच्या दुरीकरणावर ‘डायथिल कार्बामॅझिन सायट्रेट’, ‘अलबेंडाझॉल’ व ‘आयव्हरमेक्टिन’च्या गोळ्या म्हणजेच ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ प्रभावी प्रतिबंधक उपचार पद्धती आहे. यामुळे ‘मायक्रोफायलेरिया’ लवकर नष्ट होण्यास मदत होते. हे औषध उंचीनुसार, जेवणानंतर दिले जाते. दोन वर्षांपेक्षा लहान मुले, गर्भवती स्त्रिया व गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांनी औषधी घेऊ नये.

औषधाचा ‘साईड इफेक्ट’ नाही
हत्तीरोगावर औषधोपचार नाही. प्रतिबंध हाच एकमेव उपचार आहे. म्हणूनच हत्तीरोग दुरीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात उंचीनुसार दिल्या जाणाऱ्या ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ औषधांचा कुठलाही दुष्परिणाम म्हणजेच ‘साईड इफेक्ट’ नाही. मोहिमेच्या जनजागृतीवर भर दिला जात आहे. ३१ जानेवारीनंतरही मोहीम सुरू ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
-जयश्री थोटे, अधिकारी, हत्तीरोग व हिवताप विभाग, मनपा

आरोग्यसेविकांना अपमानास्पद वागणूक
दक्षिण नागपुरात मलेरिया फायलेरिया विभागाचे निरीक्षक दिलीप रामटेके यांच्या नेतृत्वात सहदेव देशपांडे निरीक्षक, ज्योती मेहत्रे व मनीषा भोयर आरोग्यसेविका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबवित आहे. न्यू बालाजीनगर परिसरात त्यांनी हत्तीरोग निर्मूलनाच्या गोळ्या घरोघरी जाऊन दिल्या. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. २० डिसेंबरपासून हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ज्योती मेहत्रे व मनीषा भोयर या आरोग्य सेविका घरोघरी जाऊन औषधी देत आहे. पण २० ते २५ टक्के लोकांकडूनच त्यांना प्रतिसाद मिळतो आहे. ज्योती यांनी सांगितले की, सुशिक्षित वस्त्यांमध्ये तर लोक घरात घ्यायला सुद्धा तयार नाही. काही लोकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे.

असा होतो हत्तीरोग
क्युलेक्स डासाच्या चाव्यातून हत्तीरोगाचे जंतू माणसाच्या रक्तात सोडले जातात.
तिथे त्याचे रूपांतर मोठ्या कृमीमध्ये होते.
एकदा शरीरात शिरलेला हा प्रौढ कृमी माणसाच्या शरीरात पाच ते आठ वर्षे राहू शकतो.
प्रौढ कृमी लसिका ग्रंथी व लसिका वाहिन्यात राहतो. यामुळे त्या भागाला हाताला आणि विशेष करून पायाला सूज येऊ लागते.
हा पाय सुजत जातो. तो हत्तीच्या पायासारखा मोठा दिसू लागतो.
हत्ती पाय पुन्हा पूर्ववत करावयाचे औषध नाही.
काही पुरुष रुग्णांमध्ये अंडाशयाला सूज येऊन कमालीचे मोठे होते. इंग्रजीत याला हायड्रोसिल म्हणतात.

Web Title: Prevention of elephantiasis; ignorance by citizens in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य