सोशल मीडियावरील पेपरफुटीला बसणार आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:05 PM2020-02-08T12:05:10+5:302020-02-08T12:07:07+5:30
सोशल मीडियावर पेपरफुटीचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले होते. त्यामुळे बोर्डाची बदनामी होत होती. यावर उपाय म्हणून बोर्डाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत वर्गातच विद्यार्थ्यांपुढे पेपरच्या पाकिटाचे सील उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल मीडियावर पेपरफुटीचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले होते. त्यामुळे बोर्डाची बदनामी होत होती. यावर उपाय म्हणून बोर्डाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेत वर्गातच विद्यार्थ्यांपुढे पेपरच्या पाकिटाचे सील उघडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देशही दिले आहे.
येत्या १८ फेब्रुवारीपासून बारावी व ३ मार्चपासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. परीक्षेदरम्यान होणाऱ्या कॉपीवर आळा घालण्यासाठी व पेपरफुटीच्या प्रकारावर निर्बंध लावण्यासाठी बोर्डाने काही उपाययोजना केल्या आहेत. यात वर्गातच पेपर पाकीट उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय परिरक्षकाला सहा. परिवेक्षकाच्या नियुक्तीचे तसेच सहा. परिवेक्षक इतर केंद्रावर बदलण्याचे आदेश दिले आहे. तसेच बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षेतसुद्धा एक्स्टरर्नल म्हणून पाठविणाºया शिक्षकांची शहर आणि ग्रामीण भागात विभागणी केली आहे.
आंतरिक गुणांचा समावेश केल्याने निकालात वाढ
दहावीच्या परीक्षेचा पॅटर्न ८०-२० असा असून, ८० गुणांची लेखी परीक्षा तर २० गुणांचे आंतरिक मूल्यमापन करण्यात येणार आहे. यावर्षी पुन्हा एकदा आंतरिक गुणांचा समावेश करण्यात आल्याने निकालात वाढ होण्याची शक्यता आहे.
बारावीची १,६८,५०८ व दहावीची १,८७,७९७ विद्यार्थी देणार परीक्षा
नागपूर बोर्डाअंतर्गत बारावीची परीक्षा १,६८,५०८ विद्यार्थी देणार आहेत. यात विद्यार्थ्यांची संख्या ८७,४९७ व विद्यार्थिनींची संख्या ८१,००१ व १० तृतीयपंथी आहेत. तर दहावीचे १,८७,७९७ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होणार असून, यात ९९,७३६ विद्यार्थी व ८७,०४९ विद्यार्थिनी व १२ तृतीयपंथी आहेत.