नागपूर जिल्ह्यातील २४०० गुन्हेगारांवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:08 PM2019-09-21T22:08:02+5:302019-09-21T22:08:54+5:30
गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी २४०० गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. यात शहरातील १२०० व ग्रामीण भागातील १२०० गुन्हेगारांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशसनासोबतच पोलीस विभागानेही कंबर कसली आहे. जिल्ह्यात सुमारे १० हजारावर पोलीस अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात येतील. यासोबतच निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासाठी २४०० गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. यात शहरातील १२०० व ग्रामीण भागातील १२०० गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रपरिषदेत दिली.
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, जानेवारीपासून आतापर्यंत शहरात जवळपास ५,६०० गुन्हेगारांविरुद्ध विविध कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी १२०० गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. यासोबतच अवैध दारू तस्करीविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथकही स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक झोननिहाय टीम तयार करण्यात आली आहे. निवडणूक शंततेत पार पाडण्यासाठी पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले की, जिल्ह्याला लागून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. निवडणूक काळात अवैध दारू व पैशाची वाहतूक होऊ नये, यावर लक्ष ठेवण्यात येईल. या दोन्ही राज्यातून नागपुरात दाखल होण्यासाठी एकूण १० मार्ग आहेत. त्यावर पोलिसांचे चेक पोस्ट तयार करण्यात येईल, यासाठी स्पेश्ल स्क्वॉड तैनात केले जाईल. ग्रामीण भागात जानेवारीपासून आतापर्यंत ४,७८८
गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी १२०० गुन्हेगारांची यादी तयार केली असून, येत्या काही दिवसात त्यांच्याविरुद्धही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. शस्त्र जप्तीची कारवाईसुद्धा सुरू केली जाईल.
पोलीस बंदोबस्त (शहर)
३६०० पोलीस कर्मचारी
५०० अधिकारी
१५०० होमगार्ड
निमलष्करी दलाच्या दोन कंपनी
पोलीस बंदोबस्त (ग्रामीण)
२२५० पोलीस कर्मचारी
१५० अधिकारी
५५० होमगार्ड
निमलष्करी दलाच्या चार कंपनीची मागणी
शहरात २८ संवेदनशील बूथ
पोलीस विभागानुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील २८ संवेदनशील बूथ आहेत. यावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात येईल.