प्रतिबंधक लसीने कोविडचा प्रादुर्भाव होणे शक्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:10 AM2021-02-26T04:10:57+5:302021-02-26T04:10:57+5:30
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही आरोग्यसेवक वा डॉक्टरांना कोविडचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. समाजमाध्यमांवर हा प्रादुर्भाव कोविडच्या ...
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही आरोग्यसेवक वा डॉक्टरांना कोविडचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. समाजमाध्यमांवर हा प्रादुर्भाव कोविडच्या लसीमुळेच झाल्याचे संदेश पसरविण्यात आले; परंतु ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसी सुरक्षित आहेत. ही लस घेतल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊच शकत नाही, अशी माहिती नागपूर एम्सच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मीना मिश्रा यांनी दिली.
विदर्भ असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टच्यावतीने (वीएएमएम) ‘व्हॅमकॉन-२०२१’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. उद्घाटन आ. रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘आयएएएम’ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. नीना नागदेव आणि आयोजन सचिव डॉ. मीनाक्षी मोरे उपस्थित होत्या.
डॉ. मिश्रा म्हणाल्या, लसीद्वारे आपण व्हायरस नव्हे, तर त्याचा डीएनए टोचून घेत असतो. या डीएनएची पुन:निर्मितीची क्षमता नसते. त्यामुळे लसीमुळे कोरोना होऊ शकत नाही. डोस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, शारीरिक अंतर व सॅनिटायझेशनचा नियम पाळणे आवश्यक आहे. इन्फेक्शन डिसिज स्पेशलिस्ट डॉ. अश्विनी तायडे म्हणाल्या, ऊठसूट प्रतिजैविके घेतली तर त्याच्याविरोधात प्रतिरोध तयार होतो. त्यामुळे छोटे विकारही गंभीर रूप घेऊ शकतात. वैद्यकीय सल्ल्याशिवाय प्रतिजैविक घेणे टाळावे. परिषदेत डॉ. रुपा विश्वनाथन, डॉ. संगीता जोशी, डॉ. रितू सिंघल, डॉ. नमिता जग्गी, डॉ. सोनल बांगडे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ. विलास जहागीरदार, डॉ. यज्ञेश ठाकर, डॉ. माधवी देशमुख यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. दीपाश्री मसरकोल्हे, डॉ. नीता गाडे व डॉ. गौरी ठाकरे यांना उत्कृष्ट शोधपत्र पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट पोस्टरचा पुरस्कार डॉ. तिर्तीशा कायल यांना प्रदान करण्यात आला. व्हीएएएमचे अध्यक्ष डॉ. सचिन देवकर व डॉ. अंजली राऊत-अखुज यांनी विशेष सहकार्य केले.
.................