पशुखाद्याचे भाव गगनाला, दुधालाही योग्य भाव मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:08 AM2021-05-19T04:08:42+5:302021-05-19T04:08:42+5:30
कळमेश्वर : कोरोनामुळे जगाचे आर्थिक चक्र बिघडले आहे. याचा फटका सर्वच वर्गांना बसतो आहे. गत दीड वर्षांत महागाईने साऱ्यांचे ...
कळमेश्वर : कोरोनामुळे जगाचे आर्थिक चक्र बिघडले आहे. याचा फटका सर्वच वर्गांना बसतो आहे. गत दीड वर्षांत महागाईने साऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पशुखाद्याचे भाव वाढल्याने पशुपालक शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. अशात लॉकडाऊन काळात कळमेश्वर तालुक्यातील शासकीय दूध संकलन केंद्रावर दुधाला केवळ २० ते २५ रुपये लिटर, असा भाव मिळत आहे. तालुक्यात जवळपास २० हजारांच्यावर दुधाळू जनावरे आहेत. या जनावरांपासून दररोज १० हजार लिटरच्यावर दूध संकलन होते. पण सध्याची परिस्थिती पाहता दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. सरकी, ढेप, मक्काचुनी, चनाकुटार व इतर साहित्याचे भाव वाढले. दुधाला मिळणाऱ्या भावाच्या तुलनेत हा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. दूध उत्पादन करणे हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. पण, या जोडधंद्यामध्येच मोठे नुकसान होत आहे.
जुने दर
सरकी ढेप : ९७० रुपये
मक्काचुनी : ८३० रुपये
चनाकुटार: २४० रुपये
नवीन दर
सरकी ढेप- १७०० रुपये
मक्काचुनी - १०२० रुपये
चनाकुटार - ३५० रुपये
दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कारखानदार मालाचा साठा करून दुप्पट भावात विक्री करत आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेकऱ्यांना शासनाने मदत करणे गरजेचे आहे.
स्वप्निल चौधरी
तालुका अध्यक्ष, मनसे, कळमेश्वर