नागपुरात सुपारीच्या किमतीत १०० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:10 AM2019-11-15T11:10:25+5:302019-11-15T11:13:10+5:30
दोन वर्षांपासून केरळ आणि मंगलोर येथे पुरामुळे सुपारी पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादन आणि आवक कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दहा दिवसात सुपारीच्या किमतीत प्रति किलो ४० रुपयांची वाढ झाली असून किरकोळमध्ये किमती १०० रुपयांनी वधारल्या आहेत.
मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षांपासून केरळ आणि मंगलोर येथे पुरामुळे सुपारी पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादन आणि आवक कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दहा दिवसात सुपारीच्या किमतीत प्रति किलो ४० रुपयांची वाढ झाली असून किरकोळमध्ये किमती १०० रुपयांनी वधारल्या आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसला आहे. त्यामुळे उलाढाल मंदावली आहे.
पांढऱ्या सुपारीचा ९० टक्के उपयोग
इतवारी चिल्लर किराणा असोसिएशनचे सचिव आणि सुपारीचे ठोक व्यापारी शिवप्रताप सिंह यांनी सांगितले की, पांढऱ्या सुपारीचे सर्वाधिक उत्पादन केरळ, मंगलोर या राज्यांमध्ये तर गोवा व तामिळनाडू येथे कमी होते. याशिवाय लाल सुपारी आसाम, मिझोरममध्ये होते. लाल सुपारीचा उपयोग फार कमी होतो. यावर्षीही केरळ आणि मंगलोर येथे अनेक दिवस पूर आणि परतीच्या पावसामुळे सुपारी पिकाला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे आवक अर्ध्यावर आली. देशात ९० टक्के पांढरी सुपारी विकली जाते. पूजा, पान, गुटखा यात पांढऱ्या सुपारीचा उपयोग होतो.
यावर्षी पांढऱ्या सुपारीच्या पिकांना फटका बसल्यामुळे गेल्या दहा दिवसात ठोक आणि चिल्लर बाजारात वाढ झाली आहे. दररोज ४ कोटींचा व्यवसाय १ कोटींवर, जीएसटीचा फटका
व्यवसाय इंदूर स्थलांतरित झाल्यामुळे इतवारी बाजारपेठेतील दररोज ४ कोटींपेक्षा जास्त होणारी सुपारीची उलाढाल आता १ कोटीवर आली आहे. केरळचे इतवारी बाजारात व्यवसाय करणाऱ्या ४० व्यापाऱ्यांपैकी आता २२ ते २३ जण व्यवसाय करीत आहेत. याशिवाय या व्यवसायाला जीएसटीचा फटका बसला आहे. देशात सुपारीवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो. दोन वर्षांपूर्वी केरळ आणि मंगलोरची सुपारी नागपुरात यायची आणि येथून संपूर्ण देशात वितरित व्हायची. पण समान जीएसटीमुळे व्यापारी थेट केरळमधून सुपारी मागवितात.
नागपूरची बाजारपेठ इंदूर येथे स्थलांतरित
नागपूर ही सुपारीची मध्य भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ होती, पण गेल्या दोन वर्षांत सुपारी व्यापाऱ्यांवर शासनाच्या धाडी आणि असामाजिक तत्त्वांच्या अवैध वसुलीच्या त्रासामुळे येथील इतवारीतील ६० घाऊक व्यापाऱ्यांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय इंदूरला स्थलांतरित केला आहे. व्यापारी नागपुरातच बसतात, पण गोदामांमध्ये सीसीटीव्ही बसवून नागपुरातून इंदूरमध्ये व्यवसाय करतात. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी दररोज १० ते १२ ट्रकचा (प्रति ट्रक १६ टन) व्यवसाय आता दोन ते तीन ट्रकवर आला आहे.
वार्षिक १० ते १२ हजार कोटींचा व्यवसाय ३ हजार कोटींवर
सुपारी नागपुरात विक्रीसाठी येण्याचे प्रमाण कमी झाले. उदाहरण द्यायचे झाल्यास नागपूर ते कानपूर सुपारी वाहतुकीचे भाडे प्रति किलो ३.५ रुपये आहे तर केरळ ते कानपूर वाहतुकीचे भाव ४ रुपये आहे. त्यामुळेच कानपूर येथील व्यापारी आता थेट केरळमधून सुपारी खरेदी करीत आहेत. सध्या या व्यवसायात गुंतवणुकीच्या तुलनेत नफा कमी झाला आहे. शिवप्रताप सिंह म्हणाले, सन १९९७ मध्ये सुपारीचे भाव दर्जानुसार ५० ते १०० रुपये प्रति किलो होते. हे भाव २००१ पर्यंत स्थिर होते. पण आता ठोकमध्ये २६० रुपये तर किरकोळमध्ये ३६० रुपयांवर गेले आहेत.
डिसेंबरमध्ये भाव कमी होणार
डिसेंबरमध्ये नवीन सुपारी बाजारात येणार आहे. आता थोडीफार आवक सुरू झाली आहे. आवक पूर्णपणे सुरू झाल्यानंतर भाव २० ते ३० रुपयांनी कमी होईल, पण किरकोळमध्ये एकदा वाढलेले भाव कमी होण्याची शक्यता नाही. इंडोनिशिया देशातून सुपारीच्या आयातीवर १५० टक्के आयात शुल्क आहे. त्यामुळे काही व्यापारी चोरट्या मार्गाने सुपारीची आयात करायचे. पण धाडसत्रानंतर सुपारी जप्त होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे चोरट्या मार्गाने सुपारी मागविणे बंद केले आहे. सरकारने सुपारीवरील आयात शुल्क कमी केल्यास देशांतर्गत भाव कमी होतील, असे शिवप्रताप सिंह म्हणाले.