सोन्यात ३३००, तर चांदीत आठ हजारांची घसरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 08:00 AM2023-02-28T08:00:00+5:302023-02-28T08:00:02+5:30
Nagpur News आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे वाढलेल्या सोने-चांदीच्या दरात १ ते २७ फेब्रुवारीपर्यंत अनुक्रमे तीन हजार आणि आठ हजारांची घसरण झाली आहे.
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दराने तब्बल ५९,३००, तर चांदीने ७२,५०० रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे वाढलेल्या सोने-चांदीच्या दरात १ ते २७ फेब्रुवारीपर्यंत अनुक्रमे तीन हजार आणि आठ हजारांची घसरण झाली आहे. ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.
उतरत्या दराचा ग्राहकांना दिलासा
२ फेब्रुवारीला दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५९,३०० आणि चांदीचे दर ७२,५०० रुपये होते. २७ फेब्रुवारीला सोने ५६ हजार आणि प्रतिकिलो चांदीचे दर ६४,५०० रुपयांपर्यंत खाली आले. जागतिक पातळीवर सोन्याचे दर घसरल्याचा परिणाम नागपुरातील सराफा बाजारात दिसून आल्याचे सराफांनी म्हटले आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांनी वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली होती. मात्र, दर घसरल्यामुळे ग्राहकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. भविष्यकालीन आर्थिक गुंतवणुकीसाठी ग्राहक सोने-चांदीचे नाणे खरेदी करीत आहेत.
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात घसरण होईल, असा अंदाज सोने व्यावसायिक आणि ग्राहकांना होता. मात्र, अर्थसंकल्पानंतर २ फेब्रुवारीला एकाच दिवसात ६०० रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर जीएसटीसह ६१ हजार इतक्या विक्रमी पातळीवर आणि चांदीचे दर ७४,७०० रुपयांवर गेले होते. परंतु, २ फेब्रुवारीनंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण होऊ लागली. ४ रोजी सोने ५७,२०० रुपयांपर्यंत घसरले. त्यानंतर थोडेफार दर वाढले आणि १० रोजी भाव ५७,३०० रुपयांपर्यंत खाली आले. १५ फेब्रुवारीला दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५६,९०० रुपये होते. १७ रोजी दर ३०० रुपयांची घसरण होऊन भावपातळी ५६,६०० रुपयांपर्यंत कमी झाली. २० फेब्रुवारीला सोने पुन्हा ३०० रुपयांनी उसळले. २५ फेब्रुवारीपर्यंत सोने ८०० रुपयांनी कमी झाले. त्यातच २७ रोजी सोन्याचे भाव ५६ हजारांपर्यंत खाली आले होते. १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात अनेक दिवस चढउतार बघायला मिळाली. त्यामुळे सराफा बाजारात अस्थिरतेचे वातावरण होते, असे सराफांनी सांगितले.
सोने-चांदीचे दर :
दिनांक सोने चांदी
२ फेब्रु. ५९,३०० ७२,५००
२७ फेब्रु. ५६,००० ६४,५००
(किमतीवर ३ टक्के जीएसटी वेगळा)