नागपुरात हरभरा आणि तूर डाळीचे भाव उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:02 AM2020-02-13T01:02:42+5:302020-02-13T01:03:31+5:30
कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार आहे. त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या कृषितज्ज्ञांच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार आहे. त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या कृषितज्ज्ञांच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत. १५ दिवसांत तूर डाळ क्विंटलमागे एक हजार आणि हरभरा डाळीचे भाव ६०० रुपयांनी कमी झाले आहेत. भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. निर्यातबंदीमुळे भाव वाढले नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.
१५ दिवसांपूर्वी ठोक बाजारात दर्जानुसार ७५ ते ९० रुपये किलो असलेली तुरीची डाळ ७० ते ८० रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय हरभरा डाळ ५४ ते ५६ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे बेसनाचे भावही कमी झाले आहेत.
अडतिया रमेश उमाठे यांनी सांगितले की, तसे पाहता यावर्षी तूर आणि हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढणार नाहीत, पण बाजारात नवीन माल येण्याच्या वृत्ताने पूर्वीच भाव कमी झाले आहेत. १५ दिवसानंतर बाजारात मालाच्या आवकीचे प्रमाण पाहता भाव पुन्हा उंचावण्याची शक्यता आहे. यावर्षी उडद आणि मुगाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. मूग ठोकमध्ये प्रति क्विंटल ९० ते १०० रुपये आणि मूग मोगर ९८ ते १०७ रुपयांवर पोहोचले आहेत. दहीवड्यासाठी उपयोगात येणाऱ्या उडद मोगरचे भाव गेल्या वर्षी १३५ रुपयांवर पोहोचले होते. पण उठाव नसल्यामुळे भाव कमी झाले. सध्या ९० ते ११५ रुपयांवर स्थिर आहेत. याशिवाय वाटाणा डाळीचे भाव कमी होऊन ठोकमध्ये प्रति क्विंटल ४ हजारांवर स्थिरावले आहेत. मोट प्रति किलो ६५ ते ८० रुपये आणि काबुली चणा ६५ ते ९० रुपये भाव आहेत.
तांदळाची आवक वाढली, भाव स्थिर
यावर्षी तांदळाचे उत्पादन चांगले असून बाजारात मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून जयश्रीराम आणि चिन्नोर तांदळाची सर्वाधिक मागणी असते. ठोकमध्ये श्रीराम तांदूळ दर्जानुसार प्रति क्विंटल ३८०० ते ४४०० रुपये आणि चिन्नोर ४३०० ते ४५०० रुपये भाव आहेत. त्याखालोखाल सुवर्णा २५०० ते २७००, बीपीटी ३ हजार ते ४४००, एचएमटी ३४०० ते ३६०० भाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून जयप्रकाश आणि शिवपार्वती या वाणाचे तांदूळ बाजारात येत आहे. भाव प्रति किलो ६० रुपये आहे.