हिरव्या मिरचीचे भाव काेसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:26 AM2020-12-13T04:26:21+5:302020-12-13T04:26:21+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : यावर्षी तालुक्यातील कपाशी गुलाबी बाेंडअळी तर धानाचे पीक तुडतुडे व खाेडअळीने फस्त केले. त्यामुळे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : यावर्षी तालुक्यातील कपाशी गुलाबी बाेंडअळी तर धानाचे पीक तुडतुडे व खाेडअळीने फस्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त मिरचीच्या पिकावर हाेती. दिवाळीनंतर आठवडाभर तेजीत असलेल्या हिरव्या मिरचीचे दर नंतर काेसळले. यात हाेणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात कपाशी, साेयाबीन, धान व मिरची ही पिके माेठ्या प्रमाणात घेतली जातात. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे साेयाबीनवर येल्लाे माेझॅक आणि धानावर तुडतुडे व खाेडअळीसह अन्य किडी व बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर कापसाची बाेंडं गुलाबी बाेंडअळींनी फस्त करणे सुरू केले. त्यामुळे साेयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून, धानाचे उत्पादन अर्ध्यावर आले. किडींपासून पिकांना वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या फवारणीमुळे या तिन्ही पिकांच्या उत्पादनखर्चात वाढ झाली.
परिणामी, शेतकऱ्यांनी त्यांचे लक्ष्य मिरचीवर केंद्रित केले. तालुक्यातील मांढळ, पचखेडी, वेलतूर, राजाेला, साळवा या भागात मिरचीचे माेठे उत्पादन घेतले जाते. पूर्वी हिरवी मिरची विकण्याची तालुक्यात साेय नसल्याने तालुक्यातील शेतकरी माैदा बाजारपेठेत हिरवी मिरची विकायला न्यायचे. ही साेय तालुक्यात झाल्याने शेतकऱ्यांनी ती कुही व मांढळ बाजारपेठेत विकायला सुरुवात केली. दिवाळीनंतर आठवडाभर मिरचीच्या दरात तेजी हाेती. त्यानंतर भाव काेसळताच शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आहे. सध्या बाजारात मिळणाऱ्या भावातून मिरची तोडण्याची मजुरी भरून निघत नाही, अशी माहिती प्रदीप कुलरकर, माेहन बांते, सतीश गाेंदेवार, शंकर देशमुख, रामदास लुटे, धनपाल लाेहारे, महेश घुगुसकर, प्रवीण लांडगे, भगवान वाघमारे, भगवान नागलवाडे, अनिल बावणे, खुशाल ठवकर, उद्धव वाघमारे, संजय मेश्राम, नीलेश कुर्जेकार, शालिक शेबे, बंडू तितरमारे, सुरेश वाघमारे, नत्थू फाेपसे या शेतकऱ्यांनी दिली.
---
शेतकरी आंदाेलनाचा फटका
पूर्वी हिरव्या मिरचीचे दर ५० ते ६० रुपये प्रति किलाे हाेते. ते आता १० ते १२ रुपये प्रति किलाेवर आले आहेत. मिरची ताेडण्यासाठी प्रति मजूर २०० रुपये प्रति दिवस मजुरी द्यावी लागते. या भागातील हिरवी मिरची दिल्ली व उत्तर प्रदेशात पाठविली जाते. दिल्ली येथे शेतकरी आंदाेलन सुरू असल्याने त्या भागात मिरची पाठविणे बंद झाल्याने दर काेसळले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.