नागपुरात उन्हानंतर वाढणार तुरीचे भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:23 AM2020-02-18T11:23:48+5:302020-02-18T11:32:21+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीची लागवड जास्त असली तरीही पावसामुळे बरेच पीक खराब झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमन्यात सध्या आर्द्रता असलेली आणि नरम तुरीची आवक १० दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत १८ ते २० हजार क्विंटल तूर बाजारात विक्रीस आली. उन्हानंतर भाव वाढण्याची शक्यता आहे.
गावराणी तुरीला मागणी
कळमना धान्य बाजाराचे अडतिया कमलाकर घाटोळे म्हणाले, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीची लागवड जास्त असली तरीही पावसामुळे बरेच पीक खराब झाले आहे, शिवाय नवीन तूर बाजारात येण्यास उशीर झाला. दहा दिवसांपासून आवक सुरू असून उन्हानंतर भाववाढीची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच काळात ५,२०० ते ५,३०० रुपये भाव होते. नागपुरी गावराणी तूर बारीक आणि स्वादिष्ट असते. त्यामुळे अन्य राज्यात जास्त मागणी आहे. कळमन्यात नागपूर जिल्ह्यातून काटोल, सावनेर, मौदा, कुही, मांढळ, उमरेड, गुमथळा येथून आणि हिंगणघाट व मध्य प्रदेशातून तूर विक्रीस येते. खरेदीचा सीझन मार्च-एप्रिलपर्यंत असतो. तसे पाहता खरेदी वर्षभर सुरू असते. कमी उत्पादन आणि मागणी वाढल्यानंतर तुरीचे भाव आणखी वाढू शकतात, असे घाटोळे म्हणाले.
त्याचप्रमाणे यावर्षी हरभऱ्याचा पेरा जास्त असला तरीही पावसामुळे ५० टक्के माल खराब झाला आहे. नवीन माल येण्याच्या शक्यतेने ४,३०० रुपयांवर पोहोचलेले भाव कमी झाले आहेत. सध्या जुन्या हरभºयाची विक्री सुरू असून, भाव प्रति क्विंटल ३,८०० ते ३,९०० रुपयादरम्यान आहे.
‘कोरोना’च्या भीतीने सोयाबीनच्या भावात घसरण
कोरोना व्हायरसची भीती भारतात दिसून येत आहे. पशुखाद्य म्हणून सोयाबीन ढेपचा कुक्कुटपालन उद्योगात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. चिकनची मागणी कमी झाल्याचा परिणाम पशुखाद्याच्या विक्रीवर झाला आहे. १०० किलो सोयाबीनपासून १७ ते १८ टक्के खाद्यतेल आणि ६५ टक्के ढेप (डीओसी) निघते. ढेपची मागणी कमी झाली आहे.